जेलरोड परिसरातीरल मळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:08 AM2018-08-26T00:08:30+5:302018-08-26T00:08:49+5:30
जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय पंचक शिवरोड ते पवारवाडी रोड, जुन्या सायखेडा रोड ते राजराजेश्वरीपर्यंत या गेल्या काही वर्षांत विकसित झालेल्या लोक वस्तीतील छोटे कॉलनी रस्ते, अतिक्रमणामुळे पूर्ण न झालेले रस्ते, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे रहिवासी खूप त्रस्त झाले आहेत.
नाशिकरोड : जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय पंचक शिवरोड ते पवारवाडी रोड, जुन्या सायखेडा रोड ते राजराजेश्वरीपर्यंत या गेल्या काही वर्षांत विकसित झालेल्या लोक वस्तीतील छोटे कॉलनी रस्ते, अतिक्रमणामुळे पूर्ण न झालेले रस्ते, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे रहिवासी खूप त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांत जेलरोडच्या दुतर्फा झपाट्याने विकसित झाल्याने मोठी लोकवस्ती वसली आहे. बिटकोकडून जेलरोडमार्गे दसक-पंचकला जाताना डाव्या हाताला जेलरोड परिसर, उपनगर व आगर टाकळी परिसराला जाऊन मिळाला आहे. तर उजव्या बाजूकडील रेल्वे लाइनपर्यंत व एकलहरे हद्दीपर्यंत लोकवस्ती वसली आहे. राजराजेश्वरी मंगल कार्यालयापासून पंचक शिवरोडने ढिकले मळा येथून जुनी पवारवाडी, जुन्या सायखेडा रोडने पुन्हा राजराजेश्वरीपर्यंत हा प्रभाग १८ मधील गेल्या काही वर्षात नव्याने विकसित झालेल्या परिसरात छोट्या-छोट्या प्लॉटवर खासगी बंगले, रो-हाउस स्कीम मोठ्या प्रमाणात स्थापन झाली आहे. बंगल्याच्या मानाने रहिवासी इमारती कमी प्रमाणात आहेत. दाट लोकवस्ती वसलेल्या या नवीन परिसरात चहुबाजूने बऱ्यापैकी मोठे रस्ते आहेत; मात्र आतील अंतर्गत कॉलनी रस्ते हे अत्यंत छोटे आहेत. सामासिक अंतरातील अतिक्रमणामुळे कागदावर रस्ता मोठा असूनसुद्धा प्रत्यक्षात छोटा आहे. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण, जागेचा ताबा न घेतल्याने काही रस्ते अर्धवट आहे. कॉलनीच्या अंतर्गत रस्त्याचे जाळे पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे रहिवाशांना लांबून फेरफटका मारून यावे-जावे लागते. श्रीरामनगर, ठाकरे चाळ, द्वारकानगर, ढिकले मळा, पूर्वांचल सोसायटी, ब्रिजनगर, राहुलनगर, केरू पाटीलनगर, बोराडे मळा, कृष्णा पार्क आदी भागातील कॉलनी रस्ते हे अत्यंत तोकडे आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंगल्याच्या आवारात पार्किंगची सोय नसल्याने बाहेर उभ्या राहणाºया चारचाकी वाहनांमुळे येण्या-जाण्यास अत्यंत छोटी जागा शिल्लक राहते. छोट्याशा कॉलनी रस्त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाºया बसेस आतमध्ये येऊ शकत नसल्याने रहिवाशांना पाल्याला सोडण्यासाठी मुख्य मार्गावर जावे लागते. दुर्दैवाने आग लागण्याची घटना घडली तर अग्निशामक दलाचा बंब पोहचू शकणार नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब, डीपी रस्त्यातच असल्याने अडचणीत आणखीनच भर पडत आहे. राजराजेश्वरीपासून असलेला पंचक शिवरोड, इंगळेनगर, पाण्याची टाकी ते पवारवाडी हा रस्ता कागदावर १८ मीटर असून, प्रत्यक्षात तो अत्यंत छोटा आहे. ब्रिजनगर ते पंचक शिवरोड कृष्णा पार्कपर्यंत रस्ता मंजूर असून, जागा ताब्यात न घेतल्याने रस्ता अर्धवट आहे. पुढे हाच रस्ता वसंत विहार, मॉडेल कॉलनीमार्गे मुख्य जेलरोडला येऊन मिळतो; मात्र मनपाकडून कॉलनीच्या अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण व जागा ताब्यात न घेतल्याने रहिवाशांना लांबून येण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. भूमिगत गटारीचे कामदेखील अर्धवट झालेले आहे. मनपाने ज्या ठिकाणी जागा ताब्यात घेतलेल्या नाहीत तेथे भूमिगत गटारीचे काम रखडले आहे.