त्र्यंबकेश्वर तालुक्यात रस्त्यांची दैना, घाटमाथ्यावर दरडींचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:13+5:302021-08-20T04:18:13+5:30
वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही गावे सामील करण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्यातील ...
वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही गावे सामील करण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्यातील काही गावे मिळून त्र्यंबकेश्वर तालुका निर्माण झाला असला तरी दोन वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था आज रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० ए, राज्य महामार्ग क्र. ३०, राज्य महामार्ग क्र. २१ व अनेक क्रमांकाचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. या प्रमुख जिल्हा मार्गांची अवस्था अतिशय वाईट झाली असून, त्यातील असंख्य रस्त्यांची अवस्था चाळणीगत झाली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग तथा ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेचा इमारत व दळणवळण विभाग पाहतो, तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नाशिक त्र्यंबक रस्ता सोडला, तर नाशिक - हरसूल, त्र्यंबक - हरसूल यामध्ये वाघेरा, देवरगाव, तुपादेवी, रोहिले ते देवरगाव फाटा, पहिने ते देवगाव घोटी या परिसरातील दोन गावांना जोडणारे जि. प.चे रस्ते तसेच तळेगाव अंजनेरी ते जातेगाव पिंपळद ते राजूर आठवा मैल अर्थात नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हे रस्ते अतिशय खराब झाले आहेत. हे रस्ते मागच्याच वर्षी मंजूर झाले होते. रस्त्यांना निधीही आला होता. पण सन २०२० हे वर्ष कोरोनाचे वर्ष असल्याने एक वर्षभर कोणतीच विकासकामे करायची नसल्याने सर्व कामांचा विकासनिधी कोरोनावर खर्च करावा लागला. त्यामुळेच मागच्या वर्षी एकही विकासात्मक काम झाले नाही. परिणामी विकासात एक वर्षभर मागे गेलो. आज तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हरसूल भागातील अनेक रस्त्यांवर दरडी पडलेल्या आहेत. पण वाहन जाण्यापुरती माती जेसीबीने बाजुला करुन रस्ते मोकळे करून काम भागवले जात आहे. आमदारांवर अवलंबून राहण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सभापती रस्ते व अन्य विकासात्मक कामे करून घेतात. पण, मागच्या वर्षी अशी कोणतीच विकासात्मक कामे न झाल्याने रस्ते दुरुस्ती अथवा नवीन रस्त्यांची कामे केली गेली नाहीत. त्यामुळेच आज रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. पावसाळ्यात तर दैना झाली आहेे. मात्र, प्रशासन तात्पुरत्या डागडुजीवर भर देते, कायमस्वरुपी या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल केला जात आहे.
इन्फो
आदिवासी पाड्यांवरील रस्त्यांची दैना
तालुक्यात आळीवमाळ फाटा ते घोटबारी खंडी फाटा ते बेज करंजपाडा, नांगरबारी वळण, वरपेचा पाडा, खंडी पाडा, उंबरघोडा ते नांगरबारी रस्ता तसेच मुरंबी ते भागओहळ कोटंबी ते रायते गडदुणे, आडगाव, बलदापाडा ते बारीमाळ, करंज पाडा, बारीमाळ ते सावरपाडा, बेज बारीबारीमाळ ते ओझरखेड, शिरसगाव, शेंब्याची बारी, भुतमोखाडा, ठाणापाडा ते दावले श्वरकडे जाणारे रस्ते खराब असून ठाणापाडा परिसरातील रस्त्यांवर दरडी मोठ्या प्रमाणावर पडल्या आहेत. जेसीबीच्या सहाय्याने दोन गाड्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. याशिवाय रायते भासवडपाडा ते बालापाडा येथील रस्त्यावरील दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी तर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही. पर्यायाने अपघात घडतात.
फोटो- १९ त्र्यंबक खबरबात
घाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी.
190821\19nsk_28_19082021_13.jpg
फोटो- १९ त्र्यंबक खबरबातघाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी.