जुन्या वाहनांनी व्यापला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:23+5:302021-03-27T04:15:23+5:30
नाशिक : द्वारका ते मुंबईनाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानासमोर मोठ्या प्रमानात ...
नाशिक : द्वारका ते मुंबईनाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानासमोर मोठ्या प्रमानात जुनाट वाहने उभी असतात. या वाहनांनी रस्ता व्यापला जात असल्याने परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडचण होत असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य
नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्रीश्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्याची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पेठरोड परिसरात वाहतुकीची कोंडी
नाशिक : पेठ रोडवर भाजीविक्रेत्यांनी रस्त्यालगत दुकाने लावल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याभागात संध्याकाळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या गाहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे.
बाजार समिती आवारात मास्कविना वावर
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अनेक जण मास्कविना वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काटेकोरपणे मास्क सक्तीची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
विविध प्रकारच्या फळांना वाढली मागणी
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संत्र्यासह विविध प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करीत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात विविध फळांना मागणी वाढली आहे. यात संत्री, सफरचंद व किवीच्या फळांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव
नाशिक : इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि घरून काम करणारे कर्मचारी यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
अधिकृत फलकांनी शहराचे विद्रूपीकरण
नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातीचे फलक लावून विद्रूपीकरण केले जात आहे. स्मार्ट रोडवरही अशाप्रकारे पोस्टर, भित्तिपत्रके लावून विद्रूपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.