शिरसगाव (ह) येथे रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: January 25, 2015 11:22 PM2015-01-25T23:22:43+5:302015-01-25T23:23:12+5:30
गैरसोय : रस्त्यांवर मोठमोठे खड्डे; अपघातात झाली वाढ
हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गडदवणे मंदिरात भाविकांची नित्याचीच वर्दळ असते. आठवडा बाजार, वैद्यकीय सेवा, दळणवळणांच्या सोयी-सुविधांच्या अपुऱ्या सोयींमुळे शिरसगाव परिसरातील ग्रामस्थांना हरसूलला यावा लागते. नाशिक व तालुक्यातून अनेक भाविक माता गडदवणेच्या दर्शनास येत असतात; परंतु परिसरातील हरसूल-गडदवणे, शिरसगाव फाटा ते शिरसगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
हरसूल-गडदवणे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागूनच शिरसगाव फाटा ते शिरसगाव परिसरातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघाताना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकास व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मुख्य बाजारपेठ, हरसूल आठवडे बाजार, वैद्यकीय सेवेसाठी या रस्त्यावरून जाताना रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिरसगाव आश्रमसाठी बांधकाम करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत आहे, तर भविष्यात गडदवणे धरण प्रस्तावित आहे.
त्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होणार असल्याने वरील रस्ताची डागडुजी न करता नव्याने हा रस्ता करावा, अशी मागणी शासनाकडे सामाजिक कार्यकर्ते रामदास महाले व ग्रामस्थांनी केली आहे.