आठ दिवसांत रस्ते दुरुस्तीचे कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:58 PM2019-12-06T23:58:34+5:302019-12-07T00:36:02+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीसह आगामी निवडणुकीच्या राखीव जागा संदर्भात महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली. या आधीचे ब्रिगेडियर पी.रमेश यांची मेजर जनरलपदी पदोन्नती निवड झाल्याने बोर्डाचे नवीन पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले ब्रिगेडियर अरविंद पी. धनंजयन यांच्यासह लष्कर नियुक्त सदस्य कर्नल पुनीत संघेरा व कर्नल अतुल बिश्त यांनी प्रथम गोपनियतेची शपथ घेतली.
देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीसह आगामी निवडणुकीच्या राखीव जागा संदर्भात महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली. या आधीचे ब्रिगेडियर पी.रमेश यांची मेजर जनरलपदी पदोन्नती निवड झाल्याने बोर्डाचे नवीन पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले ब्रिगेडियर अरविंद पी. धनंजयन यांच्यासह लष्कर नियुक्त सदस्य कर्नल पुनीत संघेरा व कर्नल अतुल बिश्त यांनी प्रथम गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर बोर्डाच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला.
बोर्डाची बैठक सुरुवात होताच, सर्व नगरसेवकांनी देवळालीसह परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाला धारेवर धरले व ताबडतोब सर्व रस्ते दुरुस्तीसह डांबरीकरण करण्याची मागणी केली. यावेळी सचिन ठाकरे यांनी भूमिगत गटारीचे काम लॅमरोडला न करण्याची नगरसेवकांची मागणी होती, मात्र तरीही हे काम ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असताना अजूनही ते पूर्ण झालेले नाही. ठेकेदार व प्रशासन एखाद्या अप्रिय घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, भूमिगत गटारीचे काम करताना निविदेतील अटीनुसार खोदाई करून पाइप टाकणे, सांध भरणे, चेंबर बांधणे व क्युरिंग करणे नंतर त्यातून सांडपाणी जाण्याची चाचणी करणे आदी कामे करणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून त्यातील एकाही अटीची आजपावेतो पूर्तता झालेली नाही, ज्या ज्या ठिकाणी भूमिगत गटारीच्या कामासाठी रस्ते खोदले गेले, ते पुन्हा न बुजविता त्यावर तेथीलच माती टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे सर्वत्र दिसून येतात, लामरोड, शिंगवे बहुला, संसरी लेन, महालक्ष्मीरोड येथून नागरिकांना जाताना त्रास होतो, त्यामुळे हे रस्ते तातडीने सदर ठेकेदाराकडून तयार करून घेणे आवश्यक आहे. यावर ब्रिगेडियर धनंजयन व मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार यांनी येत्या आठ दिवसांत या रस्त्यांची कामे करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले जाणार असल्याचे सांगितले.
खासदार हेमंत गोडसे यांनी संसरी ग्रामपंचायतीला कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वतंत्र पाणीपुरवठा करावा, असे पत्र दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या नावे एक इंच व्यासाची पाइपलाइन असलेली स्टँड पोस्ट देण्यात येणार असल्याचे कटारिया यांनी सांगितले. डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेस्ट यांच्या पत्राची दखल बोर्डाने घेऊन आठही वॉर्डातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उघड्यावर शौच करण्यास बंदी असून, नागरिकांनी स्व-खर्चाने राहत्या घराच्या जागेवर शौचालय बांधावे. यासाठी अर्ज केल्यास तत्काळ परवानगी मिळेल. सभेस उपाध्यक्ष कटारियांसह ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, मीना करंजकर, आशा गोडसे, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार, निमंत्रित सदस्य आमदार सरोज अहिरे आदी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीच्या संदर्भात राखीव असलेल्या वॉर्ड क्रमांक एक व पाचचा प्रस्ताव तसेच दोन, तीन, सहा, सातमधील महिला आरक्षण संदर्भातील प्रस्ताव मंजूर करून सदन कमांडला पाठविण्यात आला.
खोदलेला रस्ता माहीत नाही
भुयारी गटारीसाठी लॅमरोड साडेतीन किमीचा खोदलेला असताना बांधकाम विभागाचे अधिकारी हाच रस्ता फक्त ५४० मीटर खोदल्याचे सांगतात. त्यामुळे खोदलेला रस्ता नक्की किती किलोमीटर आहे हे बांधकाम विभागालाच माहीत नसल्याने नगरसेवक सचिन ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्तकेले.