रस्ता सुरक्षा सप्ताह : भरधाव कारची दोन मोटारींसह दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:48 PM2019-02-06T22:48:26+5:302019-02-06T22:50:06+5:30
दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अॅक्टीवाला जोरदार धडक दिली.
नाशिक : रविशंकर मार्गावरून वडाळागावाकडून पुणे महामार्गाकडे भरधाव जाणाऱ्या इरटिगा मोटारीने दुचाकीस्वारासह रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन मोटारींना जोरदार धडक दिली. या कारचा वेग इतका प्रचंड होता की, मोटारींना धडक देऊनही कार थांबली नाही तर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्याच्या कथड्यावर चढली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन गंभीर जखमी झाल्याचे समजते.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अॅक्टीवाला जोरदार धडक दिली. या धडकेत अॅक्टीवावरील राकेश दूर अंतरावर फेकला गेला तर दुचाकीचे दोन तुकडे होऊन चाक लांब अंतरापर्यंत निखळून पडले. अपघातग्रस्त इरटिगा कारवर तरी चालकाला नियंत्रण मिळविता आले नाही. परिणामी स्विफ्ट डिझायर कार (एम.एच१५ एफव्ही ५८९५), टाटा इंडिका (एम.एच०३ एएम ५१५९) या दोन्ही मोटारींना जोरदार धडक दिली. सुदैवाने या मोटारी रस्त्यालगत उभ्या असल्याने मोठा अनर्थ टळला. इरटिगामध्ये पाठीमागील बाजूस झोपेत असलेला सचिन शिवाजी पवार (३०, रा.जेलरोड) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नव्हती. या विचीत्र अपघातात मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.