रस्ता सुरक्षितता : वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर पांढरे पट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 03:55 PM2018-12-29T15:55:05+5:302018-12-29T16:17:04+5:30
रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे
नाशिक : वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे.
वडाळा-डीजीपीनगर रस्ता हा वर्दळीचा आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात.
रस्त्याला ठिकठिकाणी धोकादायक अपघाती वळणं आहेत. यामुळे या वळणांवरून मार्गस्थ होताना वाहने समोरासमोर येऊन अपघात घडतो. या रस्त्याला उपनगरांमधील जोड रस्तेदेखील येऊन मिळतात. त्यामुळेही या रस्त्यावरील वाहतूक असुरक्षित होते. वडाळा चौफुली, रहेमतनगर येथे पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. मात्र येथून पुढे खोडेनगर, पांडुरंग चौक, म्हसोबा चौक, गणेशनगर जोड रस्ता या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे. तसेच रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी पांढरा पट्टा मारला जावा, अशी मागणी होत आहे. तसेच दुभाजकाजवळ व रस्त्याच्या कडेला धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यावरील रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे. या मार्गावरील बंद पथदीप त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच नव्या वाहतूक बेटामध्ये नव्याने पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्तरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे.