रस्ता कामाचे पितळ उघड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:59 PM2020-06-06T20:59:53+5:302020-06-07T00:46:25+5:30
बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आलेले तलावाचे स्वरूप.
जोरण : बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
ठेकेदाराने कोणतेही शासकीय मापदंड न पाळत रस्ता बनविला असून, रस्त्याला पाणी निचरा होण्यासाठी योग्य उतार न दिल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी साचून रस्ता उखडला आहे. तर साचलेल्या पाण्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप आले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी झालेला खर्च पाण्यात गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासकीय निधी वाया गेल्याने संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश घोडे यांनी एका निवेदनाद्वारे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भाक्षी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मूलभूत सुविधा अंतर्गत या भागातील रस्ता करण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
या योजनेंतर्गत या परिसरात तीन महिन्यांपूर्वी रस्ता कॉँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, झालेल्या पावसात या कामाचा दर्जा उघडकीस आला आहे.
आम्ही राहत असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. कोणतेही शासकीय मापदंड न पाळल्याने या रस्त्यावर पाणी साचते. यामुळे या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संबंधित कामाची चौकशी व्हावी.
- राकेश घोडे,
सामाजिक कार्यकर्ते