नाशिक : ९ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी मनमाडमध्ये रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 11:16 PM2022-12-01T23:16:42+5:302022-12-01T23:19:51+5:30
मनमाड ( नाशिक ) : चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय लोकेश सुनील सोनवणे या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडीच आल्यानंतर ...
मनमाड (नाशिक) : चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय लोकेश सुनील सोनवणे या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडीच आल्यानंतर याचे तीव्र पडसाद गुरूवारी रात्री शहरात उमटले. परिसरातील संतप्त नागरिकांनी रात्री उशिरा लोकेशला न्याय मिळालाच पाहिजे. गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशा उत्स्फूर्त घोषणा देत शहरातील नेहरू भवन येथून शहरातून मोर्चा व कँन्डल मार्च काढून इंदौर - पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मोर्चात मोठ्या संख्येने महिलावर्ग सहभागी झाले होते, तर इतर नागरिक, तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता.
शहरातील नेहरू भवन जवळ एकलव्य नगर येथे राहणाऱ्या सोनवने कुटुंबातील लोकेश सोनवने हा येथील नगर परिषद शाळा क्रं.४ मध्ये इयत्ता ४ थीत शिकत होता. बुधवारी सायंकाळी भाड्याची सायकल खेळत असतांना गायब झाला. रात्री उशिरा शहर पोलिसांत तो हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली. गुरुवारी अचानक त्याचा संशयास्पद रित्या येथील जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टर हाऊस) जवळील मनमाड - दौंड लोहमार्ग शेजारी असलेल्या झाडाझुडपीत मृतदेह आढळून आला. याच अनुषंगाने मनमाड पोलीस प्रशासनाने आपली चक्र फिरवीत एका संशयताला ताब्यात घेतले असल्याची माहिती शहरात पसरतात गुरुवारी रात्री उशिरा संतप्त नागरिकांनी निषेधाच्या घोषणा देत लोकेशला न्याय मिळालाच पाहिजे आणि गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी करत हातात कँन्डल घेऊन भव्य मोर्चा काढला.
शहराच्या विविध मार्गाने जाऊन मोर्चेकऱ्यांनी अचानक शहरातून जाणाऱ्या इंदौर - पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहनांची रांग लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रास्तारोको झाल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यासह पोलीस पथकाने बळाचा वावर करत संतप्त जमाव पांगवला. मोर्चात असलेल्या महिलांनी पोलीस स्थानकात जाऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांनी महिलांना समजावून सांगत पोलीस आपले काम करत असून संशयिताला अटक केल्याचे सांगितले. कायदेशीररित्या पोलीस आपले काम करत आहे. लोकेशला न्याय मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.