अपघात रोखण्यासाठी शिक्षकाकडून रस्त्याची रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:52 PM2020-01-10T22:52:23+5:302020-01-11T01:03:25+5:30
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असून, पानसरे यांच्या कार्याचे वाहनधारकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.
जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असून, पानसरे यांच्या कार्याचे वाहनधारकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.
जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने, रायते येथील गतिरोधकांवर अनेक अपघात होऊन अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. जळगाव नेऊर येथील गतिरोधकावर औरंगाबाद येथील जवान, गतिरोधक न समजल्याने समोरच्या गाडीवर आदळल्याने जखमी झाला. तसेच जंगली महाराज आश्रमाजवळील गतिरोधकावर जळगाव नेऊर येथील गणेश ठोंबरे या युवकाचा अपघात होऊन अपंगत्व आले. सदर महामार्गाची डागडुजी करताना ठेकेदाराने या गतिरोधकांवर सफेद साईडपट्ट्या न मारल्याने व गतिरोधक समजत नसल्यामुळे अनेक वाहने अपघाताला बळी पडत आहेत. जळगाव नेऊर येथील गतिरोधकाजवळ विद्यालय असल्याने शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सफेद साईडपट्ट्या मारून गतिरोधकाची उंची कमी करावी, अशी मागणी येथील सोसायटीचे माजी पांडुरंग शिंदे, विजय शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या रंगाने गतिरोधक रंगवले आहेत.
गतिरोधक रंगावल्याने वाहनचालकांना अंदाज येत असून, अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. संबंधित प्रशासनास कधी जाग येईल आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असा सवाल उपस्थित झाला आहे.