जुन्या वाहनांनी अडवले रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:26+5:302021-04-17T04:13:26+5:30
मोकाट श्वानांकडील दुर्लक्षामुळे नाराजी नाशिक : शहरातील सारडा सर्कल, गंजमाळ परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे. अनेकदा हे ...
मोकाट श्वानांकडील दुर्लक्षामुळे नाराजी
नाशिक : शहरातील सारडा सर्कल, गंजमाळ परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे. अनेकदा हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काहीवेळा वाहनांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडून काहीवेळा दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडले असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मास्क विक्रीत पुन्हा वाढ
नाशिक : कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर विक्रीच्या प्रमाणात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता कायम राहात असल्याने एकमेव पर्याय म्हणून मास्कच वापरावा लागणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे मेडिकल तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांकडील मास्कचा खप दुपटीहून अधिक वाढला आहे.
उन्हाच्या झळांनी नागरिक परेशान
नाशिक : एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारख्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य घरातील नागरिकांना उन्हाच्या झळांनी त्रस्त केले आहे. दुपारी लागणाऱ्या झळांबरोबरच सायंकाळीदेखील गरम वारे वाहत असल्याने आपण नक्की नाशिकमध्येच आहोत का, असा विचारही मनात येऊ लागला आहे.
रुग्णालयांबाहेर नागरिकांची गर्दी
नाशिक : शहरातील कोविड रुग्णालयांमध्ये बाधित असलेल्या रुग्णांना डबा देण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची रुग्णालयांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या रुग्णांचे नातेवाईक हतबलतेने आपल्या रुग्णांना सोडण्यासाठी तर काही कुटुंबीय चाचण्या करुन घेण्यासाठी रुग्णालयांबाहेर उभे राहात असल्याने गर्दी होत आहे.