रस्ते जलमय : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची शहरात जोरदार ‘बॅटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:38 PM2020-06-13T21:38:54+5:302020-06-13T21:41:34+5:30
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली.
नाशिक : शहर व परिसराला सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१३) मान्सूनच्या पावसाने जोरदार झोडपले. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. यामुळे नागरिक घामाघुम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत मुख्य शहरासह उपनगरांमध्ये धो-धो पाऊस कोसळला. पावसाच्या धुव्वाधार ‘बॅटिंग’मुळे मनपाच्या गटारींची दैनावस्था तर झालीच मात्र नैसर्गिक नाल्यांनाही पूर आला. गोदावरीच्या अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात रात्री नऊ वाजेपासून २ हजार ४३८ क्युसेक पाणी प्रवाहित झालेले होते. यावरून शहरात झालेल्या पावसाचा जोर सहज लक्षात येऊ शकतो.
शहरातील रस्त्यांवर अक्षरक्ष: तलावासारखे पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. पावसाचा जोर जुने नाशिक, टाकळी, नाशिकरोड, गांधीनगर, अशोकामार्ग, डीजीपीनगर-१, वडाळागाव, द्वारका या भागात अधिक होता. शहरात संध्याकाळी साडेपाचनंतर केवळ दीड तासांत २१.१ मिमी इतका पाऊस झाला.
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. तोपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचे आगमन झाले नव्हते. साधारणत: अर्ध्या तासानंतर पावसाचे ढग शहराच्या मध्यवर्ती परिसराकडे सरकले आणि साडेपाच वाजेपासून जोरदार पावसाला मखमलाबाद, म्हसरूळ, पंचवटी, रविवार कारंजा, सीबीएस, मेनरोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोड, चांडक सर्कल, मुंबईनाका, इंदिरानगर, पाथर्डीफाटा या भागात पावसाला सुरूवात झाली. शहर व परिसरात सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सर्वच भागातील लहानमोठे रस्ते जलमय झाले होते.
खोडेनगर-अशोकामार्गचा नैसर्गिक नाला असो किंवा वडाळागावाचा म्हसोबा महाराज मंदिरापासून वाहणारा नैसर्गिक नाल्याला अक्षरक्ष: पूर आला होता. या नाल्यांचे पाणी एखाद्या नदीप्रमाणे वेगाने वाहत होते. वडाळागावाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कमरेइतके पाणी मुख्य रस्त्यावर प्रथमच साचले. यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरले. तसेच वडाळारोडलगत असलेल्या जयदीपनगर, मिल्लतनगर, चिश्तीया कॉलनी या वसाहतींमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने येथील मोकळ्या भुखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. असेच काहीसे चित्र अशोकामार्ग परिसरात बघावयास मिळाले. येथील मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. पावसाचे आगमन होताच या भागाचा विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आला होता. यामुळे नागरिकांचे हाल झाले.