पावसामुळे रस्त्यांची ‘चाळण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:52 PM2020-08-20T21:52:01+5:302020-08-21T00:36:54+5:30
शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम तर होतोच परंतु लहान- मोठया अपघातानाही निमंत्रण मिळत आहे.
नाशिक : शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम तर होतोच परंतु लहान- मोठया अपघातानाही निमंत्रण मिळत आहे.
पावसाने सलग पाच ते सहा दिवस आपली हजेरी कायम ठेवली, त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, डांबर निघून खडी वर आली, त्यातूनच खड्डे पडायला सुरुवात झाली, पूर्वी पासूनच खराब असलेल्या रस्त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली, शहरातील कॉलेज रोड, गंगापुर रोड मुंबई नाका शरणपूर रोड, शालिमार चौक, जुने नाशिक या भागात खड्डे पडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले आहे, खड्डे चुकविण्याच्या नादात वाहांचालकांकडून अपघात होऊ लागले आहेत.
अशीच परिस्थिती उपनगरात देखील असून, नाशिकरोड परिसरातील काही हमरस्ते व कॉलनी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच अनेक रस्त्यावरील डांबर काही प्रमाणात वाहून गेल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे दत्तमंदिर सिग्नल मोटवानी रोड, बिटको चौक, जय भवानीरोड, गायखे कॉलनी जलतरण तलावरोड, सिन्नरफाटा ते दारणानदी पूल, सामनगावरोड, विहितगाव वडनेररोड या प्रमुख हमरस्त्यासोबत कॉलनी भागातील, मळे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे.
मॉडेल रोडचीही धूळधाण
नाशिक शहरातील काही महत्त्वाचे रस्ते महापालिकेने मॉडेल रोड म्हणून विकसित केले होते, या रस्त्यांची देखील पावसामुळे वाट लागली आहे. गंगापुर, कॉलेज रोड, तिडके कॉलनी, शरणपूर रोड, त्रिंबक रोड वर जागोजागी खड्डे पडले आहेत. महामार्गाला समांतर रस्तेही पावसामुळे खराब झाले असून, प्रकाश पेट्रोल पंप समोरील उड्डाणपुलाखाली तर खड्ड्यांमुळे गुडघाभर पाणी साचू लागले आहे.
सातपूरकरांचे निवेदन
पावसामुळे सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची खुपच दुरावस्था झाली आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये येणाऱ्या कामगारांना आणि उद्योजकांना गैरसोय निर्माण झाली आहे.उखडलेल्या रस्त्यांमुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे अडथळा होत असल्याने महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी निमाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात निमाचे अध्यक्ष शशीकांत जाधव,सरचिटणीस तुषार चव्हाण, कैलास अहिरे,संजय महाजन, उत्तम दोंदे यांच्या शिष्टमंडळाने मनपाचे शहर अभियंता संजय घुगे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाची दखल घेऊन रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतले जातील. असे आश्वासन घुगे यांनी निमा शिष्टमंडळाला दिलेत.