पाइपलाइनच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:27+5:302021-06-28T04:11:27+5:30
शहरांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम शहरात सुरू असून, अनेक भागात चांगले रस्ते फोडून काम करण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याची ...
शहरांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम शहरात सुरू असून, अनेक भागात चांगले रस्ते फोडून काम करण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसंदर्भात पालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती . मात्र, त्यांच्याकडून पत्राद्वारे कळविण्यात आले की, पाइपलाइन टाकताना जे काही नुकसान होईल, ते संबंधित ठेकेदार यांनीच ते दुरुस्त करणे बंधनकारक असल्याने रस्ते असो वा इतर काही नुकसान ते सर्व संबंधित ठेकेदारच दुरुस्त करतील, असे कळविण्यात आले. नंतर नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी ठेकेदार यांनी रस्ता दुरुस्ती करावी, यासाठी पत्रव्यवहार केला, परंतु पालिका प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने कोठावदे यांनी याबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांच्याकडे याबाबत तीन-चार वेळेस तक्रार केल्यानंतर, कमी प्रमाणात फुटलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे काम सुरू झाले, परंतु तेही अत्यंत निकृष्ट असल्याने, पुन्हा कोठावदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली आहे.
शहरातील काही भागांत जेथे कमी प्रमाणात रस्ता फुटला आहे, त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार काँक्रिटची डागडुजी करत आहे, परंतु ही डागडुजी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ३ ते ४ दिवसांत रस्ता फुटायला लागला असून दुरुस्ती फक्त बिल काढण्यापुरती करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन केवळ आश्वासनापलीकडे काही केले नाही. सदरचे सुरू असलेले काम, तसेच सुरू ठेवल्याने प्रशासन आणि ठेकेदार यांची अभद्र युती असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण प्रभाग क्र.२ मध्ये एक कॉलनी रोड अंदाजे ३०० ते ४०० मीटर पूर्ण फोडला असून तो संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करणे बंधनकारक असतानाही तो रस्ता दुरुस्त न करताच, तो रस्ता नवीन करण्यासंदर्भात निविदा काढत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्तीचा पैसा कोणाच्या खिशात जाणार, असा प्रश्नही कोठावदे यांनी उपस्थित केला आहे.
===Photopath===
270621\27nsk_3_27062021_13.jpg
===Caption===
रस्त्याची दूरवस्था