पावसामुळे झाली रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:32 PM2020-07-22T21:32:19+5:302020-07-23T00:59:19+5:30
मालेगाव : पावसाळ्याच्या पहिल्या दीड महिन्यातच शहरातील रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.
मालेगाव : पावसाळ्याच्या पहिल्या दीड महिन्यातच शहरातील रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.
मालेगाव कॅम्प भागात नववसाहत वाढत असून, या भागात रस्त्याच्या समस्या आहेत. अनेक भागात रस्ते नाहीत. ज्या भागात आहेत त्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही भागात रस्ते दुरुस्ती झाली असून, अर्धे रस्ते दुरुस्ती न करता तसेच सोडून देण्यात आले असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही रस्त्यांची निकृष्ट दर्जाची डागडुजी करण्यात आली. रस्ते डांबरीकरण नावालाच करण्यात आले असून, डांबरी रस्त्यांनाही खड्डे पडल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
कॅम्पातील मोची कॉर्नर भागातील रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दरवर्षी केवळ डागडुजी केली जाते. त्याऐवजी पक्के व चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. शहरातून धुळे शहराकडे जाणारा जुना मुंबई-आग्रा महामार्ग ठिकठिकाणी उखडला असून, जाफरनगर भागात दरवर्षी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना गुडघाभर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. जाफरनगर भागात दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी नागरिकांना आंदोलने करावी लागतात.
गेल्यावर्षी जाफरनगरात आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आंदोलन केल्यानंतर महामार्ग दुरुस्त झाला होता. परंतु यावर्षी पुन्हा त्यापेक्षाही अधिक प्रमाणात रस्त्याची वाट लागली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने रिजवान बॅटरीवाला याने महामार्गावर पावसाच्या पाण्याने साचलेल्या तळ्यात झोपून आंदोलन केले. याची दखल घेऊन पुन्हा जाफरनगर भागातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धुळ्याकडे जाणारी वाहने, दुचाकीधारकांना रस्त्याच्या एका बाजूने जावे लागत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
जुना मुंबई-आग्रा महामार्गाला शिवाजी पुतळ्यापासून दरेगावपर्यंत खड्डे पडून नादुरुस्त झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर डांबरीखडी टाकून रस्ता दुरुस्तीची गरज आहे.मालेगावी सोयगाव बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. दूरध्वनी कार्यालय इमारतीपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार आहे. गेल्या दीड महिन्यापासून सावरकरनगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्ता तातडीने दुरुस्ती करावा, अशी मागणी केली आहे.
-----------------
मालेगाव कॅम्पातील मोची कॉर्नर, शिवाजी रोड, चर्च रोड भागातील रस्तेही पावसाळ्यात खड्ड्यांमुळे खराब झाले आहेत. रावळगाव नाका भागात रस्ते उखडले असून, संबंधित विभागांने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. सटाणा नाका भागाकडून जाणारा साठफुटी रस्त्याचीही अवस्था बिकट झाली आहे.
प्रांत कचेरीजवळील ‘पारस’ शोरूमकडून सोयगाव बाजाराकडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडून एकेरी झाला आहे. तहसील कचेरीमागे पेट्रोलपंपाजवळून सोयगावकडे जाणाºया रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. येथेही काही ठिकाणी रस्ते गुळगुळीत तर काही ठिकाणी खड्डे आहेत. सोयगाव बाजाराकडे जाणाºया रस्त्याचीही अवस्था बिकट झाली आहे.