भुरट्या चोरांचा मोर्चा आता शेतपिकांकडे
By admin | Published: December 25, 2014 01:46 AM2014-12-25T01:46:06+5:302014-12-25T01:46:22+5:30
भुरट्या चोरांचा मोर्चा आता शेतपिकांकडे
पिंपळगाव वाखारी : परिसरात डाळींबचोरांचा उपद्रव शांत होत नाही तोच कांदा भावातील तेजीमुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केल्यामुळे डाळिंबाबरोबरच कांद्याची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दागिने व पैसे चोरीचा चोरट्यांकडून होणारा प्रकार सर्वज्ञात असताना, आता शेतातील पिकांची चोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. अन्नधान्यांची समृद्धी आल्यानंतर पिके चोरणे बंद झाले. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होता; परंतु डाळींबबागा आल्यानंतर डाळिंबाचे व कांद्याच्या तेजीतील बाजारभाव सर्वांना भुरळ घालू लागले. त्यामुळे कांदा व डाळींब पिकांच्या चोरीतून कमी श्रमात जास्त पैसा मिळू लागल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा शेतातील कांदा व डाळींब पिकांकडे वळवला. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)