लूटमार करणाऱ्यास दोन तासांत अटक
By admin | Published: May 15, 2017 01:27 AM2017-05-15T01:27:13+5:302017-05-15T01:27:23+5:30
नाशिक : दोघा दुचाकीस्वारांना पाठीमागून येऊन एका दुचाकीस्वार चोरट्याने अडवून मारहाण करीत धारदार शस्त्राने धमकावून लूट केल्याची घटना उघडकीस आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंपिंगस्टेशन रस्त्यावरून जात असलेल्या दोघा दुचाकीस्वारांना पाठीमागून येऊन एका दुचाकीस्वार चोरट्याने अडवून मारहाण करीत धारदार शस्त्राने धमकावून लूट केल्याची घटना रविवारी (दि.१४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. यानंतर तत्काळ सरकारवाडा पोलिसांनी दोन पथके तयार करून साध्या वाहनातून शोध घेत संशयिताला कॉलेजरोड येथून संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विसे चौक परिसरातून सोमेश्वरकडे दुचाकीने जाणारे गणेश विष्णू सरकाते व त्यांचा मित्र सुमित यांना दुचाकी (एमएच १५, डीएन ६९४२) आडवी लावून संशयित सारनाथ गणकवार (२८) याने सुमित याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून धमकावत तीन मोबाइल, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, एक हजाराची रोकड लुटून पळ काढला.
यावेळी दोघा मित्रांनी जुना गंगापूर नाक्याच्या सिग्नलपर्यंत त्याचा पाठलाग के ला, मात्र सिग्नल हिरवा झाल्याने ते पळून गेले आणि गणेश व सुमित सिग्नलवर येईपर्यंत सिग्नल पुन्हा लाल झाला. त्यामुळे त्या चोरट्याचा पुढे पाठलाग करता आला नाही. दोघांनी अधिक वेळ वाया न घालविता त्वरित सरकारवाडा पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी त्वरित एक पथक तयार केले आणि त्यांनी आपल्यासोबत साध्या वेशातील पोलीस कर्मचारी घेऊन खासगी वाहनाने तपास सुरू केला.