पती-पत्नीवर स्प्रे फवारला, पिस्तूल रोखले; सशस्त्र दरोड्याने खळबळ, तब्बल ३० तोळे सोने लंपास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:06 IST2025-02-18T11:06:00+5:302025-02-18T11:06:18+5:30
दरोड्यात ३० तोळे सोने दरोडेखोरांनी घेऊन धूम ठोकली. भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीवर स्प्रे फवारला, पिस्तूल रोखले; सशस्त्र दरोड्याने खळबळ, तब्बल ३० तोळे सोने लंपास!
Nashik Crime: नाशिकमधील सिडको परिसरातील अंबड शिवारातील महालक्ष्मीनगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या 'श्री ज्वेलर्स' या दुकानात दोन तरुण दरोडेखोर सोमवारी दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून शिरले. दुकानात असलेल्या दाम्पत्यावर पिस्तूल रोखून धरत मांडण्यमध्ये असलेले सर्व सोन्याचे दागिने गोणीत भरून कॉलनी रस्त्याने पळ काढत पुढे दुचाकीने पसार झाले. या दरोड्यात ३० तोळे सोने दरोडेखोरांनी घेऊन धूम ठोकली. भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अंबड-कामटवाडे रस्त्यावरील महालक्ष्मीनगर, वनश्री कॉलनी परिसरात दुपारच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ नव्हती. सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकानेही बंद होती. तीघे दराडेखोर दुचाकीने या भागात आले. दुचाकीचालक हा रस्त्यावर दोघांना उतरवून पुढे पुढे काही अंतरावर जाऊन थांबला. सराफी दुकानात मालक दीपक घोडके व त्यांची पत्नी मनीषा घोडके हे दोघेच होते. कोणीही ग्राहक वगैरे नसताना दोघा दरोडेखोरांनी पावणे दोन वाजेच्या सुमारास दुकानात येत त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील दागिने काढून प्लास्टिक गोणीत भरणा केला. त्यानंतर तोंडावर घोडके दाम्पत्याच्या तोंडावर मिरची स्प्रे फवारून पळ काढला. घटनेची माहिती दुकानमालकांनी अंबड पोलिसांना संपर्क साधून देताच त्वरित पोलिसांची वाहने घटनास्थळी पोहचली. तरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक चमू श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
दोघांमध्ये मराठीत संवाद
दुकानात शिरलेल्या दोघांनी एकमेकांशी मराठीत संवाद साधून मिरची स्प्रे काढत फवारायला सांगितले. तसेच घोडके दाम्पत्याला वेगवेगळ्या कोपऱ्यात बसवून पिस्तूल रोखून धरले. एकाने तातडीने मांडण्यांमध्ये असलेले सर्व दागिने काढून गोणीत टाकले. यानंतर स्प्रे फवारणी करत दोघांनी पळ काढला.
चांदीचे दागिने, रोकड 'जैसे थे'
दरोडेखोरांनी दुकानात असलेले चांदीचे दागिने, रोख रकमला हात लावला नाही, ते जैसे-थे आहे. केवळ मांडण्यांमध्ये असलेले सोन्याची दागिने घेऊन पळ काढल्याचे घोडके यांनी सांगितले. सुमारे २५ लाख रूपये किमतीचे तीनशे ग्रॅम सोने या दरोडेखोरांनी लांबविल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हेगारी फोफावली
माऊली लॉज ते प्रणय स्टॅम्पिंग या मुख्य रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलींची व महिलांची छेडछाड करणे, कामगारांची लूटमार करणे, दुकानदारांवर दहशत निर्माण करणे असे प्रकार राजरोसपणे सातत्याने या ठिकाणी घडत आहेत.
घटनास्थळ चौकीपासून पाचशे मीटर अंतरावर
वनश्री कॉलनीच्या कॉर्नरवर सिंहस्थ कुंभमेळा २०१५ अंतर्गत पोलिस चौकी ठेवण्यात आलेली आहे. या चौकीपासून सराफा दुकान अवघ्या पाचशे मीटर अंतरावर आहे. अंबड पोलिस ठाणे अंकित ही चौकी असून, चौकीचे कुलूप कधीही उघडलेले नागरिकांनी बघितले नाही. यामुळे ही चौकी असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही वर्षापूर्वी याच ठिकाणी बाजीराव दातीर या स्थानिक नागरिकाने मध्यस्ती केल्याने गुन्हेगारांनी त्याच्यावर शस्त्राने हल्ला केला होता. त्यावेळी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला होता.