मलढोण शिवारात दरोडा; घरमालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:19 AM2021-11-25T01:19:11+5:302021-11-25T01:23:27+5:30

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीने सरोदे वस्तीवर दरोडा टाकून घरमालकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल, असा ६ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी सरोदे कुटुंबाने प्रतिकार करीत एका दरोडेखोराला दुचाकीसह पकडण्यात यश मिळविले. तत्पूर्वी अन्य दरोडेखोरांनी महिलांच्या गळ्यातील १३ तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घटनास्थळावरून पोबारा केला.

Robbery in Maldhon Shivara; Beating the landlord | मलढोण शिवारात दरोडा; घरमालकाला मारहाण

मलढोण शिवारात दरोडा; घरमालकाला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देएकाला पकडण्यात यश सहा लाखांचा ऐवज लंपास, १० ते १२ चोरट्यांचा धुमाकूळ

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीने सरोदे वस्तीवर दरोडा टाकून घरमालकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल, असा ६ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी सरोदे कुटुंबाने प्रतिकार करीत एका दरोडेखोराला दुचाकीसह पकडण्यात यश मिळविले. तत्पूर्वी अन्य दरोडेखोरांनी महिलांच्या गळ्यातील १३ तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घटनास्थळावरून पोबारा केला.

दरोडेखोरांनी घराबाहेर झोपलेले घरमालक वाल्मीक दगडू सरोदे (५०) यांच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून त्यांना जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सरोदे कुटुंबाने प्रतिकार केल्याने झटापटीत एक दरोडेखोर जखमी झाल्याचे समजते. त्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात समृद्धी महामार्गाच्या कडेला सरोदे वस्ती असून त्याठिकाणी वाल्मीक सरोदे चार मुलांसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री वाल्मीक सरोदे, त्यांची पत्नी विमल (४५) व आई रखमाबाई (८०) व नातू संकेत हे घराबाहेरील पडवीत झोपले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दुचाकीहून आलेल्या १० ते १२ दरोडेखोरांनी सरोदे वस्तीत प्रवेश केला. दरोडेखोरांनी पडवीत झोपलेल्या चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने त्यांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने मुलगा योगेश व त्याची पत्नी झोपेतून जागे झाले व दरवाजा उघडल्यानंतर १० ते १२ दरोडेखोर मारहाण करीत असल्याचे दिसले. ६ ते ७ जण वाल्मीक सरोदे यांना गजाने व हाताने मारहाण करीत होते, तर एकाने त्याच्या हातातील बीअरची बाटली वडील वाल्मीक सरोदे यांच्या डोक्यात फोडली.

दगड व विटांचा मारा करीत यातील ५ ते ६ जण घरात शिरले. त्यांनी महिलेचा गळा दाबून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून घेतली व लोखंडी कपाटातील पत्नीचा सोन्याचा नेकलेस, कानातील झुबे, पायातील चांदीचे जोडवे व भावजयीच्या गळ्यातील सोन्याची पोत, सोन्याची चेन व त्यांच्या कपाटातील सोन्याचा नेकलेस व भाऊ नितीन यांची सोन्याची अंगठी, चेन, ओम पान तोडून घेतले. दरोडेखोरांचा आवाज ऐकून नवीन घरात झोपलेले दोघे भाऊ पळत आले. त्याचबरोबर शेजारील वस्तीवरील भाऊबंद मदतीसाठी सरोदे यांच्या वस्तीवर आले. शेजारील वस्तीवर लोक जागे झाल्याचे पाहून दरोडेखोर ऐवज घेऊन मीरगाव-मलढोण रस्त्याने पळाले.

घटनेची माहिती परिसरातील वस्त्यांवर समजताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर कोते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाकाबंदी करण्यासह दरोडेखोरांचा तपास सुरू केला. पहाटेच्या सुमारास निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी येऊन तपासकामी सूचना केला. सरोदे कुटुंबीयांनी संशतियास पकडून वावी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, संशयिताचे नाव ऋषिकेश विजय राठोड (रा. रुई, ता. राहाता, जि. अहमदनगर) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यास झटापटीत मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितांनी काही साथीदारांची नावे दिली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते तपास करीत आहेत.

इन्फो

पाठलाग करून एकाला पकडले

दरोेडेखोरांनी घराच्या पाठीमागे दुचाकी उभ्या केल्या होत्या. दुचाकी सुरू करून ते मलढोण गावाकडे जात असताना नितीन व किशोर यांनी त्यांचा पाठलाग केला. दुचाकी गाडीवरील तिघांना पकडले, तेव्हा दोघांनी दुचाकी सोडून पळ काढला. त्यातील एका चोरट्याला सरोदे बंधूंनी पकडून ठेवले. तेव्हा झटापटीत त्यालाही मार लागून तो जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इन्फो

दरोडेखोरांचा शोध सुरू

घटनास्थळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह ठसेतज्ज्ञ व श्वान पथक हजर झाले. श्वान पथकाने समृद्धी महामार्गापर्यंत माग काढला. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्याने अन्य साथीदारांची नावे सांगितल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Robbery in Maldhon Shivara; Beating the landlord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.