सटाणा तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा, ४६ हजारांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:50 PM2019-03-18T12:50:54+5:302019-03-18T12:51:10+5:30
जायखेडा : मुल्हेर ता. बागलाण येथे पेट्रोल पंपावर हेल्मेट परिधान केलेल्या दोन अज्ञात तरूणांनी कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रूपयांची रक्कम लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जायखेडा : मुल्हेर ता. बागलाण येथे पेट्रोल पंपावर हेल्मेट परिधान केलेल्या दोन अज्ञात तरूणांनी कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रूपयांची रक्कम लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जायखेडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बागलाण तालुक्यातील अंतापूर - मुल्हेर रस्त्यावर एस्सार कंपनीचा उद्धवेश पेट्रोल पंप आहे. या पंपावर रविवार, दि. १७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पंपावरील व्यवस्थापक विनोद बोरसे हे आपल्या दोन कर्मचाऱ्यांकडून हिशोब घेत असतांना पल्सर या दुचाकीवरून आलेल्या आणि काळे हेल्मेट परिधान केलेल्या दोन तरूणांनी पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये प्रवेश करून व धारदार कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रु पयांची रोकड लुटून पोबारा केला. या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना देण्यात आल्यानंतर तातडीने नाकाबंदी करण्यात येवून, आरोपींचा कसून शोध घेतला गेला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी पंपावरील कर्मचाऱ्यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद दिली असून, कलम ३९२ अन्वये जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायखेडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपी परिसरातील असल्याची शक्यता सपोनि गणेश गुरव यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.