पेट्रोलपंपावर दरोडा; तीन जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:27 AM2020-07-20T00:27:44+5:302020-07-20T00:29:12+5:30
नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कळवण : नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदुरी शिवारातील पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर चार जण तोंडाला रु माल बांधून आले. त्यांनी कोयत्याने केबिनच्या काचा फोडत रेवण जोपळे व रवींद्र जोपळे यांना मारहाण केली. घाबरलेले पंपमालक किशोर सूर्यवंशी यांनी पैसे घ्या; पण मारू नका अशी विनंती करून चार तोळे वजनाची सोन्याची चेन, हातातील पाच तोळे वजनाचे ब्रेसलेट, भ्रमणध्वनी असा दोन लाखांचा ऐवज संशयितांना देत पळ काढला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या मजुरांनी दरोडेखोरांना पकडले. मोटारसायकल बंद पडल्यामुळे दोन संशयित सापडले तर दोन जण फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. वणी रस्त्यावर यातील एक जण सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौथ्या दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांना अज्ञात नागरिकांकडून जबर मारहाण झाली. रुग्णालयात दाखल केलेल्या संशयित तेजस सूर्यवंशी यास मृत घोषित करण्यात आले. इतर संशयितांपैकी कृष्णा महेंद्र बडगुजर यास नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. एकावर कळवण येथे उपचार सुरू आहेत.
झटापटीत तेजस सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी जमाविरु द्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयत तेजस सूर्यवंशी, रा. निरपूर ता. सटाणा, रोहित सीताराम घोडे रा. बंधारपाडा ता. सटाणा, कृष्णा महेंद्र बडगुजर व गणेश रमेश बग्गन, रा. आरटीओ कॉर्नर, नाशिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय संशयितांनीही तक्रार नोंदविल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
१४ जुलै रोजी तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलपंपावरचार अज्ञात संशियतांनी कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत सोळा हजार पाचशे रु पये घेवून पळ काढल्याची घटना घडली होती. यातील दरोड्याची व शनिवारी रात्री नांदुरी लुटीची पद्धत सारखी असल्याचा पोलिसांना संशय आहे.