खासगी रुग्णालयाकडून लूटमार; मनसे संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:13+5:302021-04-22T04:15:13+5:30
कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालये उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परंतु ही रुग्णालये अव्वाच्या ...
कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालये उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परंतु ही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली करीत आहेत. कुठल्याही प्रकारे अनामत रक्कम न घेण्याचे आदेश असताना अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. खासगी रुग्णालयांच्या या अशा धोरणामुळे सर्वसामान्य जनता भिकेला लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर वेळीच कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पोलीस प्रशासनाने वेळीच याची दखल घेत परिसरातील रुग्णालय प्रशासन, लोकप्रतिनिधी व कोविड बाधित रुग्णांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करीत मार्ग काढावा. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेचे नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे तसेच सातपूर विभाग प्रमुख योगेश लभडे, वैभव अहिरे यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाची प्रत पोलीस आयुक्तांनाही दिली आहे.
(फोटो २१ मनसे):- खासगी रुग्णालयांनी नियमाप्रमाणे कोरोना रुग्णांकडून बिलांची आकारणी करावी या मागणीचे निवेदन सातपूरचे पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना देतांना नगरसेवक सलीम शेख समवेत योगेश शेवरे, योगेश लभडे, वैभव महिरे आदी.