एटीएममध्ये खडखडाट, सीडीएम भरलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:45 PM2020-02-01T23:45:53+5:302020-02-02T00:07:20+5:30
बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपामुळे दुसºया दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना रोख रकमेची टंचाई जाणवली.
नाशिक : बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपामुळे दुसºया दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना रोख रकमेची टंचाई जाणवली.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स (यूएफबीयू)च्या नेतृत्वाखाली देशव्यापी दोनदिवसीय संप पुकारला असून, या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह एकूण नऊ संघटनांनी शुक्रवारी (दि.३१) व शनिवारी (दि.१) देशव्यापी संपात सहभाग घेतल्याने जिल्हाभरातील सुमारे साडेतीनशे शाखांमधील दीडशे ते पावणेदोनशे कोटींचे व्यवहार अडकून पडले आहेत. तर एटीएममध्ये दोन दिवसांपासून रोकड जमा झालेली नसल्याने पैसै काढण्यासाठी जाणाºया ग्राहकांची निराशा होत असून सीडीएम मशीनमधून पैसे काढले गेलेले नसल्याने हातात पैसे असतानाही ग्राहकांना आपल्या खात्यावर पैसे जमा करता येऊ शकत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या दोन दिवसांच्या संपानंतर तिसºया दिवशी रविवारच्या सुटीमुळे बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांसह व्यापार उद्योग क्षेत्रालाही या संपाचा मोठा फटका बसला आहे. बँक कर्मचाºयांना १ नोव्हेंबर २०१७ पासून २० टक्के वेतनवाढ मिळावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, स्पेशल अलाउन्स बेसिक पेमध्ये एकत्रित करावा, बँक अधिकाºयांसाठी कामाची वेळ निश्चित असावी, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, पेन्शन अपडेशन, दहा राष्ट्रीयीकृत बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी व अधिकाºयांनी पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील जवळपास ३५० शाखांमधील सुमारे २५०० कर्मचारी सहभागी झाल्याने सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज १०० टक्के ठप्प झाले आहे.
आॅनलाइनवर मदार
बँक कर्मचारी व अधिकाºयांच्या संपामुळे बँकेचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले असून, एटीएम व सीडीएममधूनही बँकेच्या खात्यावर कोणतेही व्यवहार होऊ शकत नसल्याने ग्राहकांची सर्व मदार आता आॅनलाइन व्यवहारांवर अवलंबून आहे. परंतु आॅनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होताना दिसून येत असून, त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील व्यवहारांवरही झाल्याचे दिसून येत आहे.