सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या रोहिणी कांगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:34 PM2021-07-16T16:34:44+5:302021-07-16T16:34:57+5:30
सिन्नर: सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या गुळवंच गणाच्या सदस्य रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सिन्नर: सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या गुळवंच गणाच्या सदस्य रोहिणी समाधान कांगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांगणे यांच्या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. सिन्नर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. १२ पैकी ८ सदस्य शिवसेनेचे असल्याने बिनविरोध निवडीची अपेक्षा होती. त्यानुसार शुक्रवारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत रोहिणी कांगणे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेस प्रारंभ झाला. सकाळी ११ ते दुपारी १ या निर्धारित वेळेत रोहिणी कांगणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे तहसीलदार कोताडे यांनी कांगणे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. कांगणे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड यांनी स्वाक्षरी केली होती.
विशेष सभेस उपसभापती संग्राम कातकाडे, सदस्य भगवान पथवे, सुमन बर्डे, शोभा बर्के, संगिता पावसे, जगन्नाथ भाबड, वेणूबाई डावरे उपस्थित होते. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक विजय गडाख, रवींद्र पगार, तातू जगताप, योगिता कांदळकर गैरहजर राहिले.
रोहिणी कांगणे यांची सभापतिपदी निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना नेते उदय सांगळे यांच्याहस्ते कांगणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक खुळे, संजय सानप, अशोक डावरे, रामनाथ पावसे, पिराजी पवार उपस्थित होते.