जोरण येथील रोहित्र नादुरुस्त
By Admin | Published: November 3, 2015 09:47 PM2015-11-03T21:47:48+5:302015-11-03T21:56:59+5:30
शेतकरी त्रस्त : विहिरीतून पाणी उपसणे गैरसोयीचे
जोरण : येथील रोहित्रावरील फ्यूज जळाल्याने शेतकऱ्यांना विहिरीतून पाणी उपसणे गैरसोयीचे झाले आहे. हे फ्यूज त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत अनेकवेळा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही या रोहित्राची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
बागलाण तालुक्यातील जोरण शिवारातील ग. नं. २१३ मधील रोहित्राच्या फ्यूजची पेटी काही दिवसांपूर्वी जळाली. याबाबत वीज कर्मचाऱ्यांना तसेच जोरण सबस्टेशनचे अभियंता पी. एफ. अहिरे यांना याबाबत तक्रारवजा माहिती देऊनही यात सुधारणा करण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
उघड्या वायरमुळे परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. एखाद्याला जीव गमवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवारातील शेतीमालक ताईबाई सावकार यांनी विद्युत वितरण कर्मचारी यांना अनेक वेळा सांगूनही अद्याप याबाबत कारवाई झालेली नाही. रोहित्रावरील फ्यूज टाकता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. जोरण सबस्टेशनचे नूतनीकरण करण्यात यावे ही मागणीदेखील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)