रोझेचे सरपंच, उपसरपंचांसह तिघे अपात्र
By admin | Published: February 2, 2017 11:01 PM2017-02-02T23:01:33+5:302017-02-02T23:01:49+5:30
ठपका : शौचालय नसल्याने सदस्यत्व गमविण्याची नामुष्की
मालेगाव : शौचालय नसल्याने तालुक्यातील रोझे येथील सरपंच लहानुबाई घुगे, उपसरपंच इंदूबाई गायकवाड यांच्यासह तीन
सदस्यांचे तर सुनंदा निकम या ग्रामपंचायत बैठकीस सतत तीनशे दिवस गैरहजर असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत सदस्या सुनंदा उगले यांनी सरपंच सौ घुगे, उपसरपंच सौ. गायकवाड, सुनंदा निकम, बापूसाहेब पवार, अनिकांत शेजवळ यांच्याकडे शौचालय नसल्याने सौ. निकम या तीनशे दिवस बैठकीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा तक्रारी अर्ज येथील अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.
सन २०१३ च्या निवडणुकीत पाचही सदस्य निवडून आले होते. त्यांना सहा महिन्याच्या आत शौचालय बांधू असे लिहून दिले होते. तसेच २३ डिसेंबर २०१४, २५ मे २०१६ व २० जुलै २०१६ अशा तीन वेळेस ग्रामसेवकाने संबंधितांना शौचालय बांधण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी शौचालयाचे काम केले नाही. यानंतर उगले यांनी या पाचही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबचा अर्ज दिला होता. येथील अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी याबाबतची सुनावणी घेत पाचही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. (प्रतिनिधी)