निफाडला महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:23+5:302021-09-02T04:31:23+5:30
नोव्हेंबर २०१५ मध्ये निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर निवडणूक लढली गेली. भाजप आणि सेनेच्या ...
नोव्हेंबर २०१५ मध्ये निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर निवडणूक लढली गेली. भाजप आणि सेनेच्या युतीने एक पॅनेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे पॅनेल तयार केले. मात्र, सेनेच्या नाराज गटाने आणखी वेगळा एक गट करून स्वकीयांना आव्हान दिले. या गटाने ३ प्रभागांत निवडणुका लढविल्या व दोन प्रभागात अपक्षांना पुरस्कृत केले होते. या निवडणुकीत भाजप-सेना युतीने यश मिळविले व एकूण १० जागा जिंकल्या व विरोधी राष्ट्रवादीच्या पॅनेलला ३ जागा जिंकता आल्या. सत्ता स्थापन करताना या भाजप-सेना युतीला काँग्रेस, बसप, अपक्ष मिळून ३ नगरसेवकांची साथ मिळाल्याने युतीकडे १३ जणांचे बहुमत झाले व भाजप, सेना, काॅंग्रेस ,बसप, अपक्ष या एकत्रित आघाडीची सत्ता स्थापन झाली. प्रथम नगराध्यक्ष पदाचा मान राजाभाऊ शेलार यांना मिळाला. त्यानंतर भाजपच्या चारुशीला कर्डिले या कमी कालावधीसाठी प्रभारी नगराध्यक्षा झाल्या, तर सेनेचे मुकुंद होळकर, भाजपचे एकनाथ तळवाडे हे नगराध्यक्ष झाले, तर शेवटी भाजप पुरस्कृत अपक्ष स्वाती गाजरे यांनी कमी कालावधीसाठी प्रभारी नगराध्यक्षपद भूषविले. नगरपंचायतीच्या सत्तेचा पाच वर्षांचा काळ संपला. निवडणुकीची चर्चा सुरू झाली. निफाड नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत जे सेनेचे नगरसेवक भाजपबरोबर होते, ते काही काळाने भाजपकडून दुरावले गेले. सेनेचे काही नगरसेवक पुन्हा आता राजाभाऊ शेलार यांच्याबरोबर आहेत आणि काही नगरसेवक विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत.
इन्फो
आमदारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
आता भाजपपासून दूर असलेले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाऊ शेलार, सेनेचे नेते अनिल कुंदे, सेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, माजी नगराध्यक्ष मुकुंद होळकर यांनी निफाड शहर विकास आघाडी तयार केली आहे. या आघाडीत विविध पक्ष व इतरांना स्थान मिळणार आहे. विशेष म्हणजे राजाभाऊ शेलार हे मागील निवडणुकीत भाजपचे प्रमुख नेते होते. मात्र, आता शेलार यांचा स्वतःचा सवतासुभा आहे. भाजप आणि शेलार यांच्यात आता दूरचे अंतर पडले आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पॅनेल करून काँग्रेस व इतरांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस शंकर वाघ हे भाजपचे स्वतंत्र पॅनेल करणार आहेत. तसे त्यांनी यापूर्वीही जाहीर केले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार हे काँग्रेस पक्षाची भूमिका काय घेतात, बसपचे जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण काय निर्णय घेतात तसेच सेनेचे मागील निवडणुकीतील नाराज आपली भूमिका कशी ठरवतात याकडे निफाडकर जनतेचे लक्ष आहे.