मराठा आरक्षणासंदर्भात २७ मे रोजी भूमिका ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:48+5:302021-05-21T04:16:48+5:30
नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार ...
नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.
कोरोना संकटात कुटुंबीयांना गमावलेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासोबतच मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आरक्षणाविषयी मत जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (दि. २०) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
कोरोनाच्या संकटात राज्यासाठी पुढील सहा-सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण संयमाची भूमिका घेतली असून माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत व्यक्त करतानाच यासंदर्भात राज्याच्या विविध भागांतील समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून २७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.
आक्रमक होण्याची ही वेळ नाही
माझ्या संयमाच्या भूमिकेविषयीही काही जणांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु, सध्या आक्रमक होण्याची वेळ नाही, माणसं जगली तर आरक्षासाठी लढा देता येईल, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. सत्ताधारी व विरोधातील नेते एक-दुसऱ्याविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्याच्याशी मराठा समाजाला काहीच घेणेदेणे नाही. आरक्षणाविषयी मार्ग काय काढणार आहात ते समाजाला सांगा, असे आवाहनही त्यांनी सरकारी व विरोधी पक्षातील नेत्यांना केले. दरम्यान, पंतप्रधानांना चारदा पत्र लिहूनही त्यांची वेळ मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, १०२ व्या घटनादुरुस्तीविषयीही २७ मे रोजी पत्रकार परिषदेत बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.