‘वाहतूक सुरक्षा दूत’ची भूमिका तरुणाईने बजवावी : सिंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:38 PM2019-02-04T18:38:28+5:302019-02-04T18:41:26+5:30
वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे
नाशिक : तरुणाईने बेभान व बेजबाबदारपणे वाहने दामटविण्यापेक्षा एक आदर्श नागरिकाच्या भूमिकेतून ‘वाहतूक सुरक्षा दूत’म्हणून पुढे येण्याची गरज आहे तरच आपण आपल्या शहरासह देशातील रस्त्यांवर अपघातात होणाऱ्या तरुण-तरुणींचा मृत्यू टाळू शकतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सोमवारी (दि.४) नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर-ग्रामीण पोलीस,सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ३०व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा आकाशात फुगे सोडून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सिंगल प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.जी.खोडसकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.
वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांनी ‘छोटा पोलीस’ बनून वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘वाहतूक सुरक्षा दूत’ म्हणून भूमिका बजवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. याप्रसंगी शहरातील विविध शाळांचे स्काउट-गाईड, एनसीसीचे मिळून सुमारे ३ हजार विद्यार्थी व मोटार वाहन संघटनेचे पदाधिकारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, वितरक उपस्थित होते. ‘जीवनदूत’ या संकल्पेनूत रस्ता सुरक्षा अभियान पुढील आठवडाभर साजरा केला जाणार असल्याचे कळसकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
यमदूत की, जीवनदूत?
रस्ता सुरक्षा सप्ताहच्या शुभारंभप्रसंगी डॉ. शैलेंद्र गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी ‘यमदूत की जीवनदूत’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्यातून वाहतूक नियमांचे पालन कसे गरजेचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, वाहतूक सुरक्षा काळाची गरज या विषयावर आधारित १२५०शालेय विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात आले होते. तसेच भुलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने डॉ. प्रशांत देवरे, डॉ. राहूल भामरे, डॉ. सरला सोहनंदानी यांच्यासह आदिंनी अपघातसमयी अत्यवस्थ रुग्णांना रुग्णवाहिक ा पोहचेपर्यंत प्रथमोपचार कसे द्यावे, याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले.