भूमिका वेगळ्या; पण राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात साम्य एकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:27+5:302021-07-18T04:11:27+5:30

राजकारणात कधी काय होईल याचा जसा नेम नसतो, तसेच राजकीय पुढाऱ्यांनी केलेली विधाने प्रत्यक्षात उतरतातच असेही नसते. त्यामुळे चंद्रकांत ...

Roles different; But the similarity between Raj Thackeray and Chandrakant Patil is the same! | भूमिका वेगळ्या; पण राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात साम्य एकच!

भूमिका वेगळ्या; पण राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात साम्य एकच!

Next

राजकारणात कधी काय होईल याचा जसा नेम नसतो, तसेच राजकीय पुढाऱ्यांनी केलेली विधाने प्रत्यक्षात उतरतातच असेही नसते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुकीत मनसेचे राज ठाकरे यांच्याशी युती करण्याविषयी केलेले वक्तव्यही खरे मानण्याची गरज नाही. ज्या परप्रांतीयांच्या हकालपट्टीचा मुद्दा घेऊनच मराठी मनात चेतना पेटवून मनसेची स्थापना ठाकरे यांनी केली व त्याला तरुण, महिलांचा जो काही प्रतिसाद मिळाला ते पाहता, राज ठाकरे आपल्या भूमिकेला मुरड घालून चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हात पुढे करतील, असे मनसैनिकांना जसे वाटत नाही, तसेच मनसे आपली हक्काची मराठी व्होटबॅँक भाजपाच्या नादी लागून गमावणार नाही, याची पुरेपूर खात्री चंद्रकांत पाटील यांना असणार याविषयी शंका बाळगण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील यांच्या मनसेशी युती करण्यावर घातलेल्या अटी- शर्तींवर राज ठाकरे यांनी मौन सोडलेले नसले तरी, पाटील असो की ठाकरे, दोघांच्या नाशिक भेटीमध्ये फक्त एकच साम्य आहे, ते म्हणजे एकाला महापालिकेत असलेली आपली सत्ता पुन्हा वाचवायची आहे आणि दुसऱ्याला अहंकारामुळे गमावलेली मनपाची सत्ता पुन्हा हस्तगत करायची आहे, इतकेच.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकाच दिवशी नाशिकमध्ये मुक्काम ठोकावा, हा योगायोग असला तरी, राजकारणात योगायोगावर काहीच घडत नाही. जे घडते ते ठरवून व राजकीय फायदा-तोटा पाहूनच. त्यामुळेच पाठीशी अवघे ४० नगरसेवक असताना बहुमत गाठण्यासाठी मनसेला दहा वर्षांपूर्वी भाजपाने सत्तेत सहभागी होण्याच्या अटीवर पाठिंबा दिला व त्याच बळावर पाच वर्षे मनसेने सत्ता उपभोगली आणि ज्यांनी पाठिंबा दिला त्या भाजपाने महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत मनसेलाच चीतपट करीत सत्ता हस्तगत केली, हा इतिहास आहे. अर्थातच भाजपाने मनपाची सत्ता स्वबळावर हस्तगत केली असली तरी, मनसेनेदेखील विनासंकोच जेव्हा गरज असेल तेव्हा भाजपाची पाठराखण केली आहे. सांगायचा मतलब इतकाच की, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा सोडला, तर त्यांच्याशी निवडणूक युती करण्याचा विचार होऊ शकतो, असे चंद्रकांत पाटील जरी म्हणत असतील, तर नाशिक महापालिकेची सत्ता उपभोगताना भाजपाने मनसेची परप्रांतीयांबद्दलची असलेली भूमिका जशी दुर्लक्षली तशीच मनसेनेदेखील भाजपाच्या लबाड वागणुकीकडे पाठ फिरवत जवळीक साधली होती, हे नाशिककर विसरलेले नाहीत. त्यामुळे नाशिक मुक्कामी येऊनही एकमेकांकडे पाठ फिरविण्याचा आव आणणाऱ्या ठाकरे-पाटील यांचा अंतिम हेतू नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करणे इतक्यापुरताच मर्यादित आहे, हे निश्चित. असो, दोन्ही पक्षांची भूमिका जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशी स्पष्ट होईलच; पण तूर्त तरी दोघांनीही कार्यकर्त्यांमध्ये ‘हवा’ भरण्यासाठी नाशिकला मुक्काम ठोकला. त्यातही राज ठाकरे यांची तब्येत नरमगरम असल्याची होणारी चर्चा व त्यांच्या गैरहजेरीत पुत्र अमित ठाकरे यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांतून अनेक चर्चांना ऊत आला आहे.

-श्याम बागूल

Web Title: Roles different; But the similarity between Raj Thackeray and Chandrakant Patil is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.