रल्वे प्लॅटफॉर्म दोनवर शॉर्टसर्किटने लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:09 AM2017-09-26T01:09:26+5:302017-09-26T01:09:31+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म दोनवर रविवारी रात्री सव्वादोन वाजता शॉर्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज करत लागलेली आग काही वेळातच विझल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक बालंबाल वाचले. यामुळे प्रवासी, कामगार सर्वजण घाबरून गेले होते. रेल्वेस्थानकावर तीन दिवसांत आग लागण्याची दुसरी घटना घडली आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म दोनवर रविवारी रात्री सव्वादोन वाजता शॉर्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज करत लागलेली आग काही वेळातच विझल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक बालंबाल वाचले. यामुळे प्रवासी, कामगार सर्वजण घाबरून गेले होते. रेल्वेस्थानकावर तीन दिवसांत आग लागण्याची दुसरी घटना घडली आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रविवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास मुंबई एलटीटी-पटना राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेस रेल्वे प्लॅटफॉर्म दोनवर काही वेळातच येत असल्याची उद्घोषणा झाली होती. नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्म एक, दोन व तीनवर प्रवासी, रेल्वे कामगार, खाद्य पदार्थ विक्रेते आदिंची गर्दी होती. यावेळी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पादचारी पुलाजवळ छताला लागून असलेल्या विद्युत वायरिंगमध्ये शार्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज होत मोठी आग लागली. ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या खालीच व आजूबाजूला प्रवासी बसलेले होते. स्फोटासारख्या झालेल्या जोरदार आवाजामुळे प्लॅटफॉर्म दोनवर प्रवासी व सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. आग लागल्यानंतर स्फोटासारखे आवाज होत असल्याने सर्वजण घाबरून गेले होते. यावेळी पार्सल विभागाचा कामगार श्याम गायकवाड व त्याचे सहकारी प्लॅटफॉर्म दोनवरून गाड्यांमध्ये सामान घेऊन जात होते. गायकवाड याने तत्काळ प्लॅटफॉर्म एक वरील उपप्रबंधकांच्या कार्यालयात धाव घेऊन अग्निरोधक सिलिंडर आणून आग आटोक्यात आणली. मात्र सिलिंडर संपल्यानंतर पुन्हा स्फोटासारखे आवाज होत आग वाढू लागली. भोसले यांच्या स्टॉलवरून आणखीन एक अग्निरोधक सिलिंडर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. श्याम याने उपप्रबंधक कार्यालयात धाव घेऊन उपप्रबंधक एस. जे. महाले यांना आग लागल्याचे सांगितले. महाले यांनी तत्काळ वॉकीटॉकीवरून मुंबईकडून येणारी राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेसच्या चालकाला आग लागल्याचे सांगून रेल्वे थांबविण्याची किंवा गती कमी करण्याची सूचना केली. त्यानुसार प्लॅटफॉर्म दोनच्या प्रारंभीच रेल्वे थांबविण्यात आली. तोपर्यंत इलेक्ट्रीक विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन फ्यूज आॅफ करून आग पसरणार नाही याची काळजी घेतल्याने काही मिनिटांतच आग विझली. मात्र त्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. आग विझविल्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वायर कुरतडल्याने आग
४रविवारी रात्री लागलेली आग याची पाहणी करण्यास सोमवारी सायंकाळी भुसावळ रेल्वे इंजिनिअरिंग विभागाचे सहायक अभियंता आनंद भगत आले होते. आग लागलेल्या ठिकाणी छताच्या खांबावर फ्यूज असलेल्या बॉक्समधील वायरिंग उंदराने कुरतडल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे भगत यांनी सांगितले. आगीच्या दोन घटनांमुळे स्थानकाची वायरिंग तपासणार असल्याचे स्थानकावरील नाशिकरोड रेल्वे इंजिनिअरिंग विभाग वरिष्ठ अभियंता प्रवीण पाटील यांनी सांगितले.