रोटरी क्लबने भागवली दरेवाडी ग्रामस्थांची पाण्याची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:06+5:302021-06-04T04:12:06+5:30
नाशिक : दरेवाडीच्या पाणीप्रश्नाची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ नाशिकने भाम धरणातून पाणी उपसा करणारे नादुरुस्त पंप ...
नाशिक : दरेवाडीच्या पाणीप्रश्नाची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ नाशिकने भाम धरणातून पाणी उपसा करणारे नादुरुस्त पंप दुरुस्तीचे काम करून येथील गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवली. गावात पाणी आल्याने येथील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील दरेवाडी हे एक छोटंसं आदिवासी खेडं. कालांतराने भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीच्या गावकऱ्यांनी धरणासाठी त्यागही केला; मात्र माणसं आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची उपेक्षा वर्षानुवर्षे संपेना. घशाची तहान भागविण्यासाठी येथील महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागायची. दरेवाडी येथील शिक्षक किशोर चित्ते यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे पाण्यासाठी होणारी वणवण सांगताच रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत पंप दुरुस्ती कामासाठी आर्थिक खर्चास मंजुरी घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावला. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून या गावात रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध शैक्षणिक साहित्य, संगणक, क्रीडा साहित्य इत्यादी वस्तूंचे निकडीनुसार वाटप करण्यात आले आहे. गेल्याच वर्षी या परिसरातील आदिवासी मुलींसाठी सायकलींचे वाटप करण्यात आले. या गावाच्या ग्रामविकासासाठी रोटरी सभासद सातत्याने या गावाला भेटी देत असतात. पुढीलवर्षी या गावात संपूर्ण ग्रामविकास अभियान राबविण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर हेमराज राजपूत आणि ओमप्रकाश रावत यांनी सांगितले. रोटरीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांत येथील गावकरी हिरिरीने सहभागी होत असतात.