कोबीवर फिरविला रोटाव्हेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:22 PM2020-05-15T21:22:36+5:302020-05-15T23:34:54+5:30
खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी एक एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरवित कोबीचे पीक उद्ध्वस्त केले.
खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी एक एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरवित कोबीचे पीक उद्ध्वस्त केले.
खामखेडा परिसरात दरवर्षी उन्हाळी कोबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे खामखेडा हे गाव कोबी पिकासाठी इतर राज्यात परिचित आहे. कोबीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षीही पावसाळा चांगल्या प्रमाणात झाल्याने, विहिरींनाही भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कोबी पिकाची लागवड केली होती.
कोबी पीक चांगल्यापैकी तयार झाले होते. हाती चार पैसे येतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु अचानक देशात कोरोना व्हायरस रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने देशात सर्वत्र संचारबंदी लागू झाली. शेतातील तयार झालेला कोबी बाहेरील राज्यात नेता येत नाही किंवा बाहेरील व्यापारी खरेदीसाठी शेतात येत नसल्याने कोबीचे पीक शेतातच सडू लागल्याने शेतकरी कोबी पिकावर रोटाव्हेटर फिरविताना दिसून येत आहे. खामखेडा येथील शेतकरी योगेश शिरोरे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड करणे, मशागत, रासायनिक खत, औषधे फवारणी यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केला होता, मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यापारीही उपलब्ध नसल्याने विक्रीसही अडचणी येत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या भाजीपाला बाहेर विक्रीसाठी घेऊन जाणेही अवघड आहे. ये-जा करण्यासाठीचा वाहनाचा खर्च निघणेही मुश्कील आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही कठीण असल्याने शिरोरे यांनी अखेर एक एकर क्षेत्रावरील शेतातील कोबीवर रोटाव्हेटर फिरवून पीक उद्ध्वस्त केले.