निवडणुकीचे चौघडे वाजताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:37+5:302021-08-27T04:18:37+5:30
संजीव धामणे लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव : २०१५ पर्यंत नांदगाव नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या समर्थकांची सत्ता होती. २०१६ मध्ये थेट ...
संजीव धामणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : २०१५ पर्यंत नांदगाव नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या समर्थकांची सत्ता होती. २०१६ मध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात शिवसेनेचे राजेश कवडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण पाटील यांच्यावर ४,३३२ च्या मताधिक्याने विजय मिळवला. १७ पैकी ११ शिवसेनेचे, ४ राष्ट्रवादीचे तर काँग्रेसचे २ नगरसेवक निवडून आले. सध्या परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. प्रभाग रचनेच्या सूचनेने आगामी निवडणुकीचे चौघडे वाजताच सत्ताधारी-प्रतिस्पर्ध्यांत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून प्रतिस्पर्धी ताकदीने लढण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.
नांदगाव नगर परिषदेचे राजकारण गुंतागुंतीचे असून कोणा एका पक्षाला किंवा व्यक्तीला मतदारांनी सातत्याने निवडून दिल्याचा इतिहास नसला तरी आरक्षणाच्या सोयीनुसार घरातला उमेदवार देऊन तो निवडून आणल्याची उदाहरणे आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीत वैयक्तिक हितसंबंध, कार्यकर्त्यांचे जाळे व आर्थिक गणिते यावर मतांचा खेळ असतो, हे निर्विवाद सत्य आहे. प्रचारात मात्र विकासाची मोठी आमिषे दाखवली जातात, जी प्रत्यक्षात उतरणे केवळ स्वप्नरंजन ठरते, असा अनुभव आहे.
दैनंदिन स्वच्छता, शुद्ध पाणी, चांगले रस्ते, मनोरंजनाच्या सोयी व खेळाची साधने, वाहनतळ व तक्रारींची दखल या नागरिकांच्या किमान अपेक्षा असतात. शुद्ध पाण्याच्या प्रश्नावर नगर परिषदेकडून असलेली अपेक्षा दीर्घकाळ प्रलंबित असून ती अद्याप पूर्ण झालेली नाही. आठ वर्षांपूर्वी पाण्याचा तुटवडा झाल्याने आमदार निधीतून तयार केलेली माणिकपुंज धरणाची तात्कालिक स्वरूपाची पीव्हीसी पाइपलाइन बदलवून लोखंडी पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र जुनाट व कालबाह्य जलशुद्धीकरण योजना डोकेदुखी आहे. शुद्ध पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. ५४ कोटींच्या गिरणा धरण पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्याची निविदा तयार आहे. परिषदेसमोर शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाचा आराखडा कागदावर तयार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी दिली.
प्रभाग रचनेच्या सूचनेनंतर निवडणुकांचे चौघडे वाजायला लागले असून, आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. सध्या शिवसेनेची सत्ता तळागाळापर्यंत आहे. जुने प्रतिस्पर्धी दंड ठोकायला लागले आहेत.
कोट...
संकल्पित गिरणा धरण पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी, सीसीटीव्ही यासह शहरात ठिकठिकाणी व्यायामशाळा, सावता कम्पाउंडशेजारी मनोरंजन प्रकल्प, जॉगिंग ट्रॅक, बगिचा यासह विविध विकासकामे आगामी पाच वर्षांत करणार आहे. कोरोना काळात अनेक संकल्प मागे पडले. मात्र १० कोटींची विकासकामे आमदारांच्या सहकार्याने मार्गी लावण्यात आली आहेत.
- राजेश कवडे, नगराध्यक्ष
सत्ताधाऱ्यांचा पाच वर्षांचा वेळ राजकारणात गेला. शून्य कामे झाली. स्मशानभूमीसाठी मी ६५ लाख रुपये आणले होते. त्यातून ते काम त्यांच्या काळात झाले. नागरिकांना शुद्ध पाणी नाही. राजकीय स्थिरता असून, दाखविण्यासारखे एकही काम झाले नाही. जनतेसाठी आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे.
- अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष
260821\26nsk_20_26082021_13.jpg~260821\26nsk_21_26082021_13.jpg~260821\26nsk_22_26082021_13.jpg
नांदगाव नगरपरिषद~राजेश कवडे~अरुण पाटील