नाशिकमधील 'ते' रो-हाउस निघाले गुटखा हाउस; २५ पोते गुटखा जप्त
By अझहर शेख | Published: April 14, 2024 03:16 PM2024-04-14T15:16:21+5:302024-04-14T15:17:07+5:30
कलानगर परिसरात असलेल्या लेन नंबर १ मधील गुरुप्रसाद बंगल्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केलेला असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती.
अझहर शेख, संदीप झिरवाळ, पंचवटी : दिंडोरी रोडवरील कलानगर येथे असलेल्या एका रो-हाउसमधून म्हसरूळ पोलिसांनी ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मानवी आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या गुटख्याच्या तब्बल २५ गोण्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित भास्कर लक्ष्मण गरड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कलानगर परिसरात असलेल्या लेन नंबर १ मधील गुरुप्रसाद बंगल्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केलेला असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती हवालदार देवराम चव्हाण यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांना माहिती कळविली. ढवळे यांनी उपनिरीक्षक डी. वाय. पठारे, देवराम चव्हाण, पंकज चव्हाण, पंकज महाले, सतीश वसावे यांचे पथक तयार करून त्याठिकाणी रवाना केले. पथकाने पंचांच्या समक्ष बंगल्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत झाडाझडती घेतली. यावेळी विक्रीसाठी शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी पानमसाल्याच्या २५ गोण्या आढळून आल्या. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गरड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या छापेमारीनंतर गरड हा परिसरातून फरार झाला असून, त्याच्या मागावर पथक असल्याचे ढवळे यांनी सांगितले. म्हसरूळ परिसरात यापूर्वीसुद्धा अशाचप्रकारे एका रो-हाउसमध्ये पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त केला होता. परिसरात असलेले रो-हाउस गुटखा हाऊस बनत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये यामुळे सुरू झाली आहे.