रोइंगपटू भोकनळ यांची विवाहाच्या वादग्रस्त प्रकरणातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:13+5:302021-08-19T04:20:13+5:30
नाशिक : माजी ऑलिम्पियन रोइंगपटू दत्तू भोकनळ यांचा विवाह आणि त्यासंबंधातील वादविवाद बहुचर्चित ठरला होता. संबंधित महिलेने पुण्यातील आळंदी ...
नाशिक : माजी ऑलिम्पियन रोइंगपटू दत्तू भोकनळ यांचा विवाह आणि त्यासंबंधातील वादविवाद बहुचर्चित ठरला होता. संबंधित महिलेने पुण्यातील आळंदी येथे दत्तूशी झालेल्या विवाहानंतर आता रितसर विवाह करीत नाही म्हणून गुन्हा दाखल केला होता. भोकनळ यांच्या विरोधात आडगाव पोलीस स्टेशनला भादंवि कलम ४९८ (अ) आणि ४२० अन्वये गुन्हादेखील दाखल झाल्यानंतर हे प्रकरण देशभरात गाजले होते. या प्रकरणात श्रीमती आशा काळे यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करून उभयतांचे वैवाहिक नातेसंबंध संपुष्टात आणल्याचा निकाल पुण्याच्या राजगुरुनगर न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात काळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्यांनी माध्यमांवरही त्याबाबत मुलाखती दिल्याने हे प्रकरण विशेष चर्चेत आले होते. दरम्यान, या प्रकरणात विवाह रद्द करण्यासाठी तसेच घटस्फोट मिळवण्यासाठी भोकनळ यांनी राजगुरुनगरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश श्रीमती एस. एस. पाखले यांनी घटस्फोटास मंजुरी दिली. भोकनळ हे अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोइंगपटू असून, पाच वर्षांपूर्वीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व करीत तेरावे स्थान मिळवले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चिले गेले होते.