मशिदींवरील भोंग्याच्या समर्थनात आरपीआय रस्त्यावर; मानवी साखळी करुन केलं संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:21 PM2022-05-04T18:21:21+5:302022-05-04T18:22:00+5:30
रामदास आठवलेंच्या या भूमिकेनंतर आज नाशिकमधील रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते भोंग्याच्या समर्थानात रस्त्यावर उतरले.
नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.
मशिदींवरील भोंगे बळजबरीने काढले जात असतील तर, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संरक्षणासाठी मशिदीबाहेर उभे राहतील, मुस्लीम समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका रिपब्लिक पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.
रामदास आठवलेंच्या या भूमिकेनंतर आज नाशिकमधील रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते भोंग्याच्या समर्थानात रस्त्यावर उतरले. राज ठाकरे हे हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत मनमाडला आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भोंग्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.
सदर मोर्चा शहरातील नगीना मशिदजवळ आल्यानंतर येथे कार्यकर्त्यानी मानवी साखळी करून मशिदचे संरक्षण केले. यावेळी कार्यकर्त्यानी राजा ठाकरे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. राज्य आणि देश हा संविधानाने चालतो कोणाच्या ही अल्टीमेटमवर नाही. राज ठाकरे हुकूमशाही करत असून देशात अशांतता माजवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
नाशिक- नाशिकमधील रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते भोंग्याच्या समर्थानात रस्त्यावर उतरले. pic.twitter.com/bUPLSbTldF
— Lokmat (@lokmat) May 4, 2022
दरम्यान, राज ठाकरे म्हणतात की, हा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, पण तसं नाहीय, हा विषय तेवढाच धार्मिक आहे. मशिदीवरचे भोंगे काढण्याबाबत कुठल्याही तक्रारी आतापर्यंत नाहीत. हे आधीपासून सुरु आहे मग ते भोंगे कशाला काढायचे. ते पण आपल्या सणांना तक्रार करत नाहीत. हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद होता कामा नये. यावर केंद्राने धोरण ठरवावं असं बोललं जात आहे तर त्यावर विचार करु, असंही रामदास आठवले म्हणाले होते.
राज ठाकरेंची पत्रकार परिषद-
मनसेच्या आंदोलनाबाबत आणि पुढील माहिती देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात आज मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरही राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे.