चांदवड-देवळा तालुक्यासाठी ३९.२० कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:59+5:302021-07-03T04:10:59+5:30
डॉ. आहेर यांनी सांगितले की, जलजीवन मिशन ही केंद्राची योजना असून, यामुळे तहानलेल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. ...
डॉ. आहेर यांनी सांगितले की, जलजीवन मिशन ही केंद्राची योजना असून, यामुळे तहानलेल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार दर दिवशी प्रतिमाणसी ४० लिटरने पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु जलजीवन मिशनअंतर्गत आता तो ५५ लिटर करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी चांदवड तालुक्यातील २९ गावांसाठी २०.५० कोटी रुपये तर देवळा तालुक्यातील १७ गावांसाठी १८.७० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे.
याशिवाय या योजनेंतर्गत जुन्या पाणीपुरवठा योजनांच्या सुधारात्मक पुनर्जोडणी तसेच पाण्याचे स्रोत बळकटीकरण तसेच पंप बदलणे, पाइपलाइन, जलकुंभ अशा इतर कामांसाठी अ आणि ब असे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यात भाग अमधील कामांसाठी चांदवड तालुक्यातील १३ गावे घेण्यात आली असून, ५.९६ कोटी रुपये व देवळामधील १४ गावांसाठी ६.०१ कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच भाग बमध्ये चांदवड तालुक्यात २१ गावांसाठी १२.६१ कोटी रूपये तर देवळा तालुक्यातील सात गावांसाठी २.९५ कोटी रुपयांची तरतूद आहे. या योजनेमुळे ‘हर घर नल में पानी’ म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. मतदारसंघातील १०१ गावांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने या गावातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
इन्फो
योजनेतील लाभार्थी गावे
देवळा तालुक्यातील भऊर, फुलेमाळवाडी, गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, गुंजाळनगर , काचणे, खामखेडा, माळवाडी, मटाणे, मेशी, सरस्वतीवाडी, श्रीरामपूर, वासोळ, विठेवाडी, वाखारी, वरवंडी या गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.