४८० कोटींच्या रिंगरोडचा ‘नसता उपद्व्याप’
By Admin | Published: September 29, 2015 11:22 PM2015-09-29T23:22:46+5:302015-09-29T23:24:07+5:30
ज्या कुंभपर्वासाठी अट्टहास, त्यालाच लागला गळफास
नाशिक : कधी कधी ‘नसती उठाठेव’ कामास येते; परंतु ‘नसता उपद्व्याप’ केला की त्याचा कसा फियास्को होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक महानगरपालिकेने साकारलेले अंतर्गत व बाह्य रिंगरोड होय. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक महानगरपालिकेने शासनाला सादर केलेल्या ११११ कोटी रुपयांच्या आराखड्यातील सुमारे ४८० कोटी रुपये म्हणजे जवळपास निम्मी रक्कम रस्त्यांच्या कामांवर खर्च केली. मात्र, प्रत्यक्षात पर्वणीकाळात नको त्या ठिकाणी केलेला रस्त्यांचा उपद्व्याप काही कामास आला नाही. अर्थात, महापालिकेच्या या पांढऱ्या हत्तीला खाकी वर्दीने बंदोबस्ताच्या नावाखाली जागोजागी जखडून ठेवल्याने ज्यासाठी केला होता अट्टहास तोच फसला गेल्याचे निदर्शनास आले.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा तयार केला गेला तेव्हा नाशिक महापालिकेने आपला स्वतंत्र १०५० कोटींचा आराखडा केंद्र व राज्य सरकारला सादर केला होता. त्यानंतर वाढीव ६१ कोटींमुळे आराखडा ११११ कोटींवर जाऊन पोहोचला. त्यातील ७५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे ६८९ कोटी रुपये नाशिक महापालिकेला राज्य शासनाकडून प्राप्त होणार होते, तर उर्वरित २५ टक्के रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करायची होती. नाशिक महापालिकेच्या आराखड्यात प्रामुख्याने सर्वाधिक बजेट होते ते रस्त्यांचे. अंतर्गत व बाह्य रिंगरोड, केंद्रीय रस्त्यांचे व नदीपात्राकडे येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण यासाठी ४६२.५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित धरण्यात आला होता. सिंहस्थानिमित्त लाखोच्या संख्येने भाविक दाखल होतील तेव्हा भाविकांची वाहने बाहेरच्या बाहेरच बाह्य रिंगरोडने बाह्य वाहनतळांवर जातील. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडणार नाही. काही अंतर्गत रस्त्यांचाही वापर कुंभ पर्वणीकाळात भाविक मार्ग म्हणून करता येईल, असे सारे चित्र महानगरपालिकेने रंगवले आणि १०२ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यात १८.६० कि.मी. अंतर्गत रिंगरस्ते, २०.३० कि.मी. बाह्य रिंगरस्ते, ८ मीटर रुंदीचे २.८० कि.मी. मध्य रिंगरस्ते, ३९.७५ कि.मी. केंद्रीय रस्ते आणि २५.७४ कि.मी. नदीपात्राकडे येणारे व प्रशासकीय मार्गासाठी रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. याशिवाय नव्याने पाच पूलही साकारण्यात आले. त्यात गोदावरी नदीवर नांदूर नाका, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळ आणि वालदेवी नदीवर देवळाली गाव येथे समांतर पुलाची निर्मिती झाली. तर, नाशिक-टाकळी शिवरस्त्यावर आणि तपोवन लिंकरोडवर नवीन पुलाची उभारणी करण्यात आली.
महानगरपालिकेने कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते आणि पुलांची उभारणी केली; परंतु प्रत्यक्ष पर्वणीकाळात या रस्त्यांचा किती वापर झाला, याची चिकित्सा आता होऊ लागली आहे. दि. २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अतिरेकी नियोजनाचा फटका महापालिकेने तयार केलेल्या रिंगरोडलाही बसला. पोलिसांनी बाह्य वाहनतळांवरच बाहेरगावाहून येणारी वाहने रोखल्याने रिंगरोडचा वापर झालाच नाही. पहिल्या पर्वणीला झालेल्या चुका नंतर दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीला सुधारण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला; परंतु बाह्य रिंगरोडचा काही प्रमाणातच वापर होऊ शकला. प्रामुख्याने, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या हद्दीत आणि शहराबाहेर उभारलेल्या बाह्य वाहनतळांवरच मुळात अपेक्षेपेक्षा कमी संख्येने खासगी वाहने आली. सदर वाहने रिंगरोडवर धावण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. जी काही वाहने धावली त्यात बव्हंशी पासधारक अथवा व्हीआयपी वाहनांचाच समावेश होता. पोलिसांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला भलेही वाहतुकीच्या नियोजनात शिथिलता आणण्याचा आव आणला असला तरी, ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे वाहने रिंगरोडवरून मोठ्या संख्येने धावताना दिसलीच नाहीत. कुंभपर्वणीला रेल्वे आणि एसटीनेच भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले. त्यामुळे, नाशिकरोड रेल्वेस्थानक ते काठेगल्ली-द्वारका हा मार्ग वगळता अन्य मार्गांवर वाहतुकीची वर्दळ दिसून आली नाही. जेथे महापालिकेची अत्यावश्यक सेवा मानल्या गेलेल्या घंटागाडीलाही खतप्रकल्प गाठता आला नाही तेथे अंतर्गत-बाह्य रिंगरोडवर खूप मोठ्या संख्येने वाहने धावली असतील, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.