कोराेनाबाधितांच्या नावाने ७५ लाखांची खवय्येगिरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:16+5:302021-05-15T04:14:16+5:30
गेल्या वर्षी कोरोनाचे महासंकट आल्यानंतर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर ...
गेल्या वर्षी कोरोनाचे महासंकट आल्यानंतर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृह आणि ठक्कर डोम येथेही कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आले. याठिकाणी महापालिकेने नाश्ता आणि भोजन पुरविण्याचे ठेके दिले असले तरी बहुतांशी रुग्णांच्या नातेवाइकांनी आपल्या आप्तेष्टांना घरूनच डबे पोहोचविले आहेत. आजही बिटको किंवा झाकीर हुसेन असो अथवा अन्य कोविड सेंटर्स असो नागरिक डबे घेऊनच जातात. बिटको रुग्णालयाच्या बाहेर तर रांगा लागलेल्या असतात.
एकीकडे रुग्णांचे नातेवाईक घरून जेवणाचे डबे नेत असताना दुसरीकडे मात्र भाेजनाचे तब्बल ७५ लाख रुपयांचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्यात आला आहे. १२७ रुपये प्रतिथाळी असा दर नमूद करण्यात आला आहे. बिटको रुग्णालयातील भोजनाचे बिलच ३० लाख रुपये इतके आहे. उर्वरित बिल अन्य कोविड सेंटरचे आहे. त्यामुळे
७५ लाख रुपयांच्या भोजनावर नक्की ताव कोणी मारला, असादेखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
इन्फो...
येत्या सोमवारी (दि.१७) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भोजन बिलाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.