अभ्यासिका इमारतीसाठी ३० लाख रुपयांचा निधी

By admin | Published: March 10, 2017 12:54 AM2017-03-10T00:54:21+5:302017-03-10T00:54:53+5:30

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथे अभ्यासिका इमारत उभारणीसाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविलेल्या ३० लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी दिली.

Rs.30 lacs for study building | अभ्यासिका इमारतीसाठी ३० लाख रुपयांचा निधी

अभ्यासिका इमारतीसाठी ३० लाख रुपयांचा निधी

Next

 सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथे अद्ययावत अभ्यासिका इमारत उभारणीसाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविलेल्या सुमारे ३० लाख रुपयांच्या प्रस्तावास नावीन्यपूर्ण योजनेतून मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी दिली.
परिसरातील १५ गावांचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या वडांगळीत वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्रही येथे आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. माजी विद्यार्थी संघाने जून महिन्यात झालेल्या मेळाव्यात ग्रामपंचायतीकडे अभ्यासिकेसाठी एखादी जुनी इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायत मालकीच्या उपलब्ध असलेल्या इमारतीतून जुनी इमारत देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्याचवेळी जून महिन्यात ग्रामपंचायतीने शासनाकडे अभ्यासिकेसाठी प्रस्ताव दाखल केला होता.
ग्रामपंचायतमार्फत अभ्यासिकेचा प्रस्ताव शासनाकडे दाखल झाल्यानंतर त्यास मंजुरी मिळावी म्हणून सरपंच सुनीता सैंद, उपसरपंच नानासाहेब खुळे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी माजी पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी लक्ष घालण्याची मागणी केली होती. नावीन्यपूर्ण योजनेतून इमारतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ३० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती उपसरपंच खुळे यांनी दिली. फर्निचर, पुस्तके, संगणक व अन्य सुविधांसाठी वेगळा निधी मिळणार असून आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या मजल्यासाठीही शासनाकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन कोकाटे यांनी दिल्याचे खुळे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत मागे राहता कामा नये, त्यांना सुविधा मिळाव्यात, या हेतूने अभ्यासिकेला मंजुरी देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेबरोबरच विविध वर्गातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश पात्रता परीक्षा, सीईटी, नीट आदि परीक्षांच्या अभ्यासासाठीही या अभ्यासिकेचा उपयोग होणार आहे. त्यात संगणक, इंटरनेट आदि सुविधा मिळणार असून, वेळोवेळी समुपदेशन वर्गही
आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच खुळे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Rs.30 lacs for study building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.