आरटीई प्रवेशार्थींना आता लॉटरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:23+5:302021-04-05T04:13:23+5:30
नाशिक : राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात ...
नाशिक : राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, ऑनलाइन अर्जाची मुदत ३० मार्चला संपली आहे. या प्रक्रियेत राज्यभरातून सुमारे सव्वा दोन लाख हजार प्राप्त झाले असून यात नाशिकच्या १३ हजार ३२७ प्रवेशार्थींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आता आरटीईच्या ऑनलाईन सोडतीची प्रतीक्षा लागली असून आपल्या पाल्याला या सोडतीतून प्रवेशाची संधी मिळणार की नाही, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी एप्रिलअखेरपर्यंत सोडत काढली जाण्याची शक्यता व्यक्त होते? असली तरी खासगी शाळांचा प्रतीपूर्तीची पुरेशी रक्कम न मिळाल्याने प्रवेश प्रक्रियेला असलेला विरोध आणि कोरोनाचा वाढता प्रसार यामुळे लॉटरी प्रक्रियेचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. आरटीई पोर्टलमधील ओटीपीची तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पालकांकडून अर्ज भरण्यास वेग आला होता. राज्यभरात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६५८ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून त्यासाठी राज्यभरातून २ लाख २३ हजार ६१ पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यात एकट्या नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळेतील ४ हजार ५४४ जागांसाठी १३ हजार ३२७ पालकांनी अर्ज सादर केले असून एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे सोडतीत कोणाची निवड होते? यासाठी पालकवर्गाला ऑनलाईन लॉटरीची कधी निघणार याची प्रतीक्षा लागली आहे.
इन्फो
राज्यातील आरटीईची स्थिती
शाळा : ९ हजार ४३२
उपलब्ध जागा : ९६ हजार ६५८
प्राप्त अर्ज : २ लाख २३ हजार ६१
इन्फो
जिल्ह्यातील आरटीईची स्थिती
शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४५४४
प्राप्त अर्ज - १३३२७