शाळास्तरावरच होणार आरटीई प्रक्रिया ; शाळाच ठरविणार प्रवेशाचे वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 02:32 PM2020-06-27T14:32:21+5:302020-06-27T14:35:23+5:30
कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तरावरच ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.
नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तरावरच ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत सहभागी शाळा स्थानिक स्तरावर त्यांचे वेळापत्रक निश्चित करून ही प्रवेश राबवू शकणार आहे. त्यामुळे यापूर्वी १७ व १८ मार्चला आॅनलाइन लॉटरी काढल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेविषयी चौकशी करावी लागणार आहे.
शिक्षण विभागाने आरटीई पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार, शैक्षणिक वर्ष २०२०-२१करिता राबविण्यात येणाºया प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे. त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळांकडून स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात येणार असून, या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रियत सहभागी होऊ न शकणाºया पालकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन संधी दिल्या जाणार आहेत. तसेच लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (एसएमएस) द्वारे कळविला जाणार आहे. परंतु पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरही प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये व प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना सोबत नेऊ नये अशा सूचनाही करण्यात आल्या असून, शाळांना प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे :
पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळेत जाताना लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर.टी.ई. पोर्टलवरील हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पालकांना शाळेत घेऊन जावी लागणार आहे.