हेल्मेट न वापरणाऱ्यांना आरटीओचा ‘सेमिनार मेमो
By admin | Published: October 29, 2015 11:53 PM2015-10-29T23:53:16+5:302015-10-29T23:59:01+5:30
हजेरी अत्यावश्यक : वाहतूक पोलिसांकडून जागेवर ‘वसुली’
नाशिक : महामार्गावर वाहनाचा वेग अधिक असतो. त्यामुळे अपघातामध्ये वाहनचालकांचा जीवही धोक्यात येतो म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने हेल्मेट व सीट बेल्ट सक्ती राष्ट्रीय व राज्य महामार्गाबरोबरच शहरातही गरजेची असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.२९) प्रादेशिक परिवहन विभागाने थेट कॉलेजरोडवर तपासणी मोहीम राबविली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडे कागदपत्रांची तपासणी क रून त्यांना ‘सेमिनार मेमो’ बजावला. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून मात्र जागेवरच हेल्मेट न वापरला म्हणून दंड आकारला जात आहे.
महामार्गावर तसेच शहरातदेखील होणाऱ्या अपघातांमध्ये डोक्याला गंभीर मार लागून होण्याऱ्या मृत्यूच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे हेल्मेट व सीट बेल्टचा वापर गरजेचा असल्याचे निर्देश समितीने दिले आहे. त्यानुसार शहरात नागरिकांमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यासाठी आरटीओने पावले उचलली आहेत. प्रारंभी महामार्गांवर तपासणी करणाऱ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून आता शहराकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा महामार्गावर वापर करणे बंधनकारक आहे; मात्र आरटीओकडून शहरातील विविध भागांमध्येदेखील हेल्मेट तपासणीची मोहीम राबविली जात आहे. (प्रतिनिधी)