आरटीओत हेल्मेट सक्ती की मुक्ती?
By admin | Published: August 6, 2016 01:05 AM2016-08-06T01:05:00+5:302016-08-06T01:05:11+5:30
बंधनमुक्त : ९० टक्के कर्मचारी दुचाकीस्वारांना सहज मिळतो प्रवेश
नाशिक : राज्य सरकारने पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचा निर्णय घोषित केला आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. मुळातच हेल्मेट सक्ती हा विषयच वादग्रस्त आहे. दुचाकी चालविताना ‘सर सलामत तो...’ या विधानाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती केली खरी, परंतु ती वादात सापडली आणि त्याला ठिकठिकाणी विरोध झाला. नागरिकांना सुरक्षिततेचे महत्त्व जर स्वत:हून पटत नसेल, तर अखेरीस यंत्रणांना सक्ती करावी लागते. त्याच आधारे नाशिकच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना म्हणजेच जे दुचाकीवर येतात, त्यांना हेल्मेटशिवाय ‘नो एन्ट्री’ असा सक्त नियम करण्यात आला. इतकेच नव्हे, तर किमान ज्या यंत्रणेने कायद्याचे पालन करावे त्या आवारात तरी हेल्मेटधारीच प्रवेश करू शकतील, असे फर्मान काढण्यात आले. त्यामुळे ज्यांना कोणत्याही कामासाठी आरटीओ कार्यालयात दुचाकीने यायचे असेल तर हेल्मेटशिवाय प्रवेश नाही, असा आदेशच जारी केला. सरकारी आदेशाचे आणि त्यातही हेल्मेट सक्तीचे मनावरच घ्यायचे नाही अशी मानसिकता असलेल्यांनी त्याकडे काणाडोळा केला; मात्र अशा प्रकारे हेल्मेटशिवाय येणाऱ्या सव्वाशे कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर नाईलाजाने का होईना, परंतु आरटीओ कार्यालयात हेल्मेट घालूनच जावे लागत होते. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाचा आदर्श अन्य शासकीय कार्यालयांनी घेतला पाहिजे, असे मत हेल्मेट समर्थन करणाऱ्यांनी मांडले असताना आरटीओ कार्यालयातही पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले. (प्रतिनिधी)
‘