मोकाट जनावरांचा धुडगूस; चारचाकी वाहनाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 06:46 PM2019-03-08T18:46:57+5:302019-03-08T18:47:57+5:30
लासलगाव : बंदोबस्त करण्याची मागणी
लासलगाव : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून मध्यंतरी मोकाट जनावरांच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्र वारी (दि.८) मोकाट जनावरांनी धुडगूस घातल्याने चार चाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात बसलेली पाहायला मिळतात. अनेक वेळा या मोकाट जनावरांच्या मारामाऱ्या भर रस्त्यात सुरू असतात. या मारामारीत अनेक वाहनांचे नुकसान यापूर्वी झालेले आहे. मोकाट जनावरांची संख्या मोठी असल्याने परिसरात मोकाट जनावरांमुळे भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात फळांचे व्यापारी असलेल्या शौकत शेख यांचा मोकाट जनावरांच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्र वारी विद्यानगर येथील सरस्वती शाळेसमोर मोकाट जनावरांची मारामारी सुरू असताना अमोल गायकर यांची मारु ती सियाज गाडी दूरवर उभी करण्यात आली होती मात्र मोकाट जनावरांनी त्या गाडीच्या दिशेने पळत येऊन जोरात धडक दिल्याने त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोकाट जनावरांची लासलगाव शहरात दहशत निर्माण होत असून या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.