सव्वाशे वर्षांच्या खंडू वस्ताद तालमीचे रुपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:27 PM2020-01-13T16:27:01+5:302020-01-13T16:27:22+5:30
येवल्याचे वैभव : भुजबळांकडून ३० लाखांंचा निधी मंजूर
येवला : ‘घर तेथे पहिलवान’ अशी ख्याती असलेल्या येवला शहरात शेकडो मल्ल घडविणाऱ्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या खंडू वस्ताद तालमीचे रुपडे पालटणार असून तालमीला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तालमीच्या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
येवला शहराचे खंडू वस्ताद तालमीशी अत्यंत जिव्हाळ्याचे असे नाते राहिलेले आहे. १२५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या या तालमीतील लाल मातीतून अनेक मल्लांनी राष्ट स्तरावर प्रतिनिधीत्व करत शहराची मान उंचावलेली आहे. खुल्या आखाड्यात अथवा सार्वजनिक उत्सवात कुस्त्यांचे फड रंगवत खुले आव्हान देत काली कुस्ती करण्याचा पायंडा या तालमीने पाडला आहे. खंडू वस्ताद तालमीत टिल्लू पहिलवान, खानापुरे, परशराम पहिलवान,गोपाळदादा शिंदे, बळवंतदादा शिंदे, आनंदराव शिंदे, किसनराव शिंदे, माजी नगराध्यक्ष दिनकरराव शिंदे, काशिनाथ बापू शिंदे, विश्वनाथ शिंदे यांच्यासह अनेक मल्लांनी महाराष्टसह अन्य प्रांतातील विविध ठिकाणचे कुस्तीचे फड गाजविले आहे. अलीकडच्या काळात बाळू शिंदे, आबा शिंदे,भाऊ पहिलवान महाले, मुकेश गुजर ,सुरेश शिंदे यांनी मिनिटात चीतपट कुस्ती करण्याचे कसब अनेकदा सिद्ध केले आहे. या तालमीत युवकांना लाजवील अशा वयाच्या ९० व्या वर्षी सुद्धा मोठ्या जोशात मल्लविद्याचे प्रशिक्षण गुलाबराव पहिलवान महाले देत असतात. तालमीचे व्यवस्थापन गेल्या १५ वर्षांपासुन नगरसेवक गणेश शिंदे पाहत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत तालमीची पडझड होऊन दुरवस्था झालेली आहे. सदर तालमीत सुविधा पुरवविण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गणेश शिंदे यांनी केली होती. त्यानुसार, भुजबळ यांनी तालमीच्या जिर्णोदद्धारसाठी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तालमीचे रुप बदलण्यास मदत होणार आहे.