कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळणे आवश्यक : राजेंद्र खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:12+5:302021-09-18T04:15:12+5:30
येवला : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असल्याने गाफील न राहता तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी ...
येवला : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असल्याने गाफील न राहता तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी सर्वच सज्ज राहिले आहेत. कोरोना हा न थांबणारा असल्याने तो आणखी वाढू नये, यासाठी सर्वांनीच शासन निर्देश, नियम पाळून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
कोरोना लाटेत मृत्यू संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. सर्व आशा, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक यांची रिक्त पदे जास्त असल्याने आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी जिवाची पर्वा न करता काम केले व अजूनही करत आहेत. रुग्णसंख्येत घट दिसत असताना मृत्यू दर मात्र वाढताच होता. कोरोना प्रतिबंधासाठी आता लस आली असून, लसीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुरूवातीला सर्वत्र लसीचा तुटवडा होता. लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली, त्याचबरोबर लसीचा पुरवठा अधिक प्रमाणात होत असल्याने आता सर्वत्र लस मिळत आहे. आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावागावात कोविड लसीकरण सत्र राबवताना विशेषत: आरोग्यसेविकांची फार दमछाक होत आहे. नागरिकांनी लसीकरणस्थळी येताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे. येवला तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांच्यावर असून, इतक्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करणे सोपे काम नसल्याने नागरिकांनी, गाव पातळीवरील नेत्यांनी शासनाला विशेषतः आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहनही खैरे यांनी केले आहे.