सत्ताधारी राष्ट्रवादीला डझनभर गटात उमेदवारच नाही
By admin | Published: February 15, 2017 12:59 AM2017-02-15T00:59:00+5:302017-02-15T00:59:16+5:30
आघाडीत अर्धा डझन गट बाद
नाशिक : गेल्या दोन दशकांपासून जिल्हा परिषदेच्या लालदिव्यावर हक्क सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत लालदिवा आणि पर्यायाने सत्ता टिकविणे अवघड असल्याचे चित्र आहे. एकूण ७३ गटांपैकी १५ ठिकाणी पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे नाहीत. हरसूलसारख्या हक्काच्या गटातून उमेदवार बाद झाल्याने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने काही तालुक्यांत कॉँग्रेससोबत आघाडी केली आहे. अन्य तालुक्यांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार स्वबळावर उभे आहेत. कळवण या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या होम पिचवर अभोणा गटातून अचानक पक्षाचे उमेदवार सुभाष राऊत व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तो पक्षाला एक धक्का मानला जात आहे. हरसूल गटातून पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक माळेकर यांचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या पत्नी रूपांजली माळेकर या अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीला पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे. सिन्नर तालुक्यातील सहापैकी चास, देवपूर, ठाणगाव या तीन गटात पक्षाला उमेदवार उभे करता आलेले नाही. नाशिक तालुक्यात एकलहरे गटातून, निफाड तालुक्यात उगाव, कसबे सुकेणे, सायखेडा गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे नाहीत. इगतपुरी तालुक्यातून वाडीवऱ्हे, मालेगाव तालुक्यातून झोडगे, वडनेर, चांदवड तालुक्यात तळेगाव रोही, वडेनरभैरव, नांदगाव तालुक्यातून न्यायडोंगरी, बागलाण तालुक्यातून ब्राह्मणगाव गटात राष्ट्रवादीला उमेदवार उभे करता आलेले नाही. सद्यस्थितीत ७३ पैकी २७ गटातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार निवडून आलेले आहेत. तर तीन जागाहून निवडून आलेल्या सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीची संख्या ३० पर्यंत पोहोचली आहे. यंदा मात्र ७३ पैकी १५ ठिकाणी उमेदवारच उभे न करता आल्याने या राष्ट्रवादीला तो एक धक्का मानला जात आहे. (प्रतिनिधी)