सरकारातील घटक पक्षही भाजपाला दणका देणार
By admin | Published: February 8, 2017 10:06 PM2017-02-08T22:06:54+5:302017-02-08T22:06:54+5:30
वीस उमेदवार घोषीत: अन्य ठिकाणी पुरस्कृत करणार
नाशिक : राज्यात भाजपाबरोबर सत्तेत असूनही महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा वाटा न मिळाल्याने छोटे पक्ष नाराज आहेत. त्यांनी कुवतीनुसार उमेदवार उभे केले आहेत. परंतु त्याही पलीकडे जाऊन आता भाजपाला देणका देण्याची तयारी सुरू असून, विरोधकांना पुरस्कृत करण्याची तयारी सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी ही माहिती दिली.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांत युती आघाडीचे दिवस सुरू झाल्यानंतर राज्यात भाजपाबरोबरच सत्तेत असलेल्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन आघाडी केली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं आणि रासपाचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय संभाजी ब्रिगेडसह अन्य काही पक्षही सहभागी होते. भाजपाने महापालिका निवडणुकीत काही जागा घटक पक्षांना मिळाव्या अन्यथा स्वबळावर लढवू, असा इशारा त्यांनी दिला होता. परंतु नाशिक भाजपात प्रथमच इच्छुकांची संख्या वाढल्याने या पक्षाने छोट्या मित्र पक्षांशी चर्चा करू करू म्हणत म्हणत अखेरपर्यंत झुलवले. छोट्या पक्षांची नाशिकमध्ये पुरेशी ताकद नाही, परंतु तरीही चर्चा करू असे सांगत भाजपाच्या नेत्यांनी टाळाटाळ केल्याने अखेरपर्यंत या पक्षांना युतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे छोट्या पक्षांनी एकूण २० उमेदवार उभे केल्याचे हंसराज वडघुले यांनी सांगितले.
विशेष म्हणजे आता भाजपाच्या विरोधात या पक्षांनी दंड थोपटले आहेत. भाजपा विरुद्ध मतदारात नाराजीचे वातावरण आहे. अर्थसंकल्पातही भाजपाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केलेला दिसत नाही, अशा स्थितीत भाजपाला धक्का देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घटक पक्षांचे उमेदवार नाही, अशा ठिकाणी भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना त्यातही बहुतांशी शिवसेनेला समर्थन देण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा उत्साहात असलेल्या भाजपाला निवडणुकीत भाजपा विरुद्ध सर्व अशा पद्धतीने संघर्ष करावा लागणार आहे.